सोईंअभावी नागपूर विमा रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:09 PM2018-12-07T23:09:41+5:302018-12-07T23:14:40+5:30
रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णालय चालविण्यास राज्य शासन सक्षम नसेल तर तसे सांगावे, राज्य कामगार विमा योजना व कुटुंब कल्याण (ईएसआयसी) हे रुग्णालय चालवायला घेईल, असेही ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णालय चालविण्यास राज्य शासन सक्षम नसेल तर तसे सांगावे, राज्य कामगार विमा योजना व कुटुंब कल्याण (ईएसआयसी) हे रुग्णालय चालवायला घेईल, असेही ते म्हणाले.
‘ईएसआयसी’ महामंडळाचे सदस्य तिवारी यांनी शुक्रवारी सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयाची अधोगती पाहून आश्चर्य व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना तिवारी म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यातच आली नाहीत. साधारण ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची संख्या फारच कमी आहे. औषधांचा तुटवडा आहे. यंत्रसामुग्रीचा अभाव आहे. राज्य शासनाचे सहकार्य नसल्यामुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळेच रुग्ण दाखल केले जात नाही. रुग्णांना खासगी इस्पितळांमध्ये पाठविले जाते. रुग्णालयात खाटांची संख्या १३० आहे परंतु ४० वर रुग्ण भरती नाहीत. कामगार रुग्णांच्या वेतनातून पैसे कापूनही त्यांना योग्य पद्धतीची आरोग्य सेवा मिळत नसेल तर त्यांचे संतापणे समजू शकतो. यावर वैद्यकीय अधीक्षकांचे येथील रुग्ण ‘अॅग्रेसिव्ह’ आहेत असे म्हणणे चुकीचे आहे.
तिवारी म्हणाले, रुग्णालयाच्या समस्यांसाठी पुढील महिन्यात, जानेवारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याशी भेट घेणार आहे. रुग्णालयातील ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही काय करावे ते सांगावे, असा प्रस्तावही त्यांना देऊ. राज्य शासन रुग्णालय चालविण्यास सक्षम नसेल तर त्यांनी ‘ईएसआयसी’कडे रुग्णालयाचा कारभार सोपवावा, असेही ते म्हणाले. या भेटी दरम्यान संजय कटकमवार, अजय यादव, अमर मुखी यांच्यासह रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोना देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी भावना चौधरी व वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.
बुटीबोरी रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर
बुटीबोरी येथे प्रस्तावित असलेल्या २०० खाटांचे कामगार रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर आहे. बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वाशीम येथील कामगार रुग्णांनाही वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. रुग्णालयातील समस्यांच्या निराकरणासाठी रुग्णालयाला भेटी देत राहील, असेही तिवारी म्हणाले.