त्याने प्रसंगावधानाने वाचविले ३२ जणांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:33 PM2019-08-17T22:33:32+5:302019-08-17T22:35:24+5:30
धावत्या बसच्या स्टेअरिंगवरच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस हेलकावे खात असल्याचे दिसून येताच प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दिशेने धावले. कुणाला काही कळत नव्हते. बसचे ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी बसच्या खाली पडला. पण दुसऱ्या प्रवाशाने प्रसंगावधान साधून शिताफीने बसचा ब्रेक दाबला आणि खाईत जाणाऱ्या बसला रोखून त्याने ३२ जणांचे प्राण वाचविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या बसच्या स्टेअरिंगवरच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस हेलकावे खात असल्याचे दिसून येताच प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दिशेने धावले. कुणाला काही कळत नव्हते. बसचे ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी बसच्या खाली पडला. पण दुसऱ्या प्रवाशाने प्रसंगावधान साधून शिताफीने बसचा ब्रेक दाबला आणि खाईत जाणाऱ्या बसला रोखून त्याने ३२ जणांचे प्राण वाचविले.
हा चित्रपटाचा प्रसंग नाही तर बुटीबोरी औद्योगिक परिसरात २ ऑगस्टला घडलेला थरारक प्रसंग होय. या प्रसंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेत प्रवाशांचे प्राण वाचविणारा देवदूत म्हणजे नरेंद्र लोणगाडगे. निर्मल समूहाचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्या हस्ते शनिवारी नरेंद्रचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नरेंद्र लोणगाडगे यांनी जेव्हा घडलेला प्रसंग जसाचा तसा वर्णन केला तेव्हा ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. संवाद साधताना ते म्हणाले, ३२ प्रवासी इंडोरामाचे युनिट असलेल्या स्पेनटेक्स कंपनीचे कर्मचारी आहेत. बस २ ऑगस्टला सकाळी ७ वाजता कर्मचाऱ्यांना घेऊन कंपनीत जात होती. बस बुटीबोरी औद्योगिक परिसरातील मार्गावर धावत होती, पण काही वेळात हेलकावे खाऊ लागली. कुणालाच काही सुचत नव्हते. बसच्या स्टेअरिंगवर ड्रायव्हर निपचित पडून होता. त्यावेळी बस डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या मार्गावर धावू लागली. अचानक घडलेल्या घटनेने सर्व प्रवासी घाबरले. बसचे ब्रेक दाबण्यासाठी समोरील सीटवरील प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनकडे धावले. बस हेलखावे खात असल्यामुळे बसचा दरवाजा उघडला गेला. हेमराज भदाडे बसचे ब्रेक दाबण्यासाठी धावले असता दरवाज्याबाहेर पडले. ते थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला मार लागला.
नरेंद्रने क्षणाचाही वेळ न घालविता स्टेअरिंगच्या खाली पाय टाकला आणि ब्रेक दाबले. बस क्षणातच रस्त्याच्या कडेला थांबली. हा प्रसंग वेणा नदीजवळील सी.जी. दांडेकर कंपनीसमोर घडला. त्याचवेळी रस्त्यावरून येणारे दोन ट्रक वेगात गेले. बस थांबलेल्या जागेच्या १० पावलांच्या अंतरावर १०० फूट खाई होती. बस थांबली नसती तर सेकंदात खाईत कोसळली असती. त्यानंतर काय घडले असते, याची कल्पनाही करणे शक्य नाही. बसमध्ये १० महिला आणि २२ पुरुष कर्मचारी होते. घटनेनंतर रस्त्यावरून जाणारे लोक गोळा झाले. घटनेची सूचना बुटीबोरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. या जीवघेण्या घटनेत प्रसंगावधानाने ३२ जणांचे प्राण वाचविल्याबद्दल नरेंद्र लोणगाडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.