योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या उत्साहाने शंखनाद केला होता. मात्र प्रचार-प्रसाराच्या या मोहिमेला काहीसा ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. अनधिकृत धार्मिकस्थळांवरील कारवाईमुळे नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे अन् सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपावर हा संताप निघतो आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या विकासात्मक योजना आणि कामे जनतेपर्यंत न्यायची तरी कशी असा प्रश्न बूथविस्तारक, पेजप्रमुखांसमोर पडला आहे. एकीकडे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी तर दुसरीकडे नागरिकांचा भावनिक रोष, अशा दुहेरी कात्रीत बूथविस्तारक-पेजप्रमुख सापडले आहे. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत न्यायच्या तरी कशा असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.विरोधकांची होत असलेली एकजूट आणि देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये अपेक्षित यश हाती न लागल्यामुळे भाजपसमोरील आव्हानांमध्ये अगोदरच वाढ झाली आहे. नागपूर लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पक्ष कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळेच ‘बूथविस्तारक’, ‘पेजप्रमुख’, ‘शक्तिप्रमुख’ योजना राबविण्यात आली. संघटन बांधणीसोबतच सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचविणे व नवीन कार्यकर्ते पक्षासोबत जोडणे हा यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत नागपूर शहरात १ हजार ९१४ ‘बूथप्रमुख’ नेमण्यात आले होते. तर पेजप्रमुखांची संख्या हजारांमध्ये आहे. यांचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरूदेखील झाले होते.मात्र अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईला सुरुवात झाली आणि बूथविस्तारक, पेजप्रमुखांसमोरील अडचणी वाढल्या.शहरातील अनेक भागांमध्ये तर प्रचार-प्रसाराचे हे कार्य अक्षरश: या कार्यकर्त्यांना बंद करावे लागले आहे. पक्षासाठी कार्य करत असले तरी हे कार्यकर्ते वर्षभर जनतेमध्ये जातात. मात्र अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे नागरिकांकडून हा संताप या लोकांवरच काढण्यात येत आहे. आम्ही लोकांमध्ये काय मुद्दे घेऊन जायचे हाच आमच्यासमोरील प्रश्न असल्याची भावना काही बूथविस्तारकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
वरिष्ठांच्या अपेक्षापूर्तीचा दबावबूथविस्तारक, पेजप्रमुख केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांमध्ये घेऊन गेले होते. तुम्ही आम्हाला विकासाबाबत सांगितले, आता धार्मिक स्थळांबाबत बोला, अशीच संतप्त प्रतिक्रिया त्यांना मिळते आहे. जनतेमध्ये न जावे तर वरिष्ठांकडून बौद्धिक दिले जाते. तळागाळात काम करताना आम्हाला काय अडचणी येत आहे, हे आम्हालाच ठावूक. मात्र तुम्ही आपले कार्य सुरूच ठेवा, असा संदेश वरिष्ठ पातळीहून आला आहे. आम्ही करायचे तरी काय, असाच बूथविस्तारक व पेजप्रमुखांचा सूर आहे.
नागरिकांची अशीही नाराजीपूर्व नागपुरातील एका धार्मिकस्थळावर कारवाई करण्यात आल्याने नागरिक संतप्त होते. अशा स्थितीत भाजपचे बुथविस्तारक तेथे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी गेले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करत त्याला अक्षरश: पिटाळून लावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहराध्यक्ष म्हणतात ‘आॅल इज वेल’याबाबत शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा दावा केला. धार्मिकस्थळांच्या प्रकरणात आम्ही जनतेच्या भावनेसोबत आहोत. हा न्यायालयीन मुद्दा आहे. मात्र आम्ही जनतेसोबत उभे आहोत. लोक हे पाहत आहेत व त्यांना वास्तव ठाऊक आहे, असे कोहळे यावेळी म्हणाले.