नागपुरात आवक घटल्याने आंबा खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:34 AM2018-05-09T11:34:08+5:302018-05-09T11:34:17+5:30
उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या भावामुळे आंब्याची गोडी कमी झाली आहे.
बेमोसमी हवामान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळंंचा राजा असलेल्या आंब्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी आंध्र प्रदेशातून कळमना बाजारात येणाऱ्या बैंगनफल्ली आंब्याची आवक कमी झाली असून भाव ठोकमध्ये दर्जानुसार २५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये आंबा ८० ते १०० रुपये किलो विकण्यात येत आहे.
वादळी तडाख्याचा परिणाम
कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे अडतिया असोसिशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा आंब्याची आवक कमी असल्याने ग्राहकांना पसंतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे. तुलनात्मरीत्या यंदा आंब्याचे ३० टक्केच उत्पादन आहे. यासोबत वादळी पावसामुळे १० टक्के आंबा खराब झाला आहे. वादळी तडाख्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातून कळमन्यात गेल्या १५ दिवसांपासून ५ ते ८ टन क्षमतेच्या १२० ते १२५ गाड्या येत आहेत. आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहील. याशिवाय भिवापूर, कुही, मांढळ, पवनी, लाखांदूर आणि गोंदिया भागातून गावरान लंगडा दसेरी आंब्याची आवक सुरू आहे. गेल्यावर्षीच्या २० ते २५ टेम्पोच्या तुलनेत यंदा केवळ २ ते ३ टेम्पो कळमन्यात येत आहेत. तसेच कोकणातील हापूस आंबे यंदा कमी प्रमाणात येत आहेत. एक डझन पेटीचे भाव ४०० ते ४५० रुपये आहेत.
डोंगरे म्हणाले, मे महिन्यानंतर उत्तर प्रदेशातून दसेरी आंबे बाजारात येतील. पण या राज्यातही वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा ५० टक्के आंबे बाजारात येण्याचा अंदाज आहे. तपत्या उन्हामुळे जमिनीतील उष्णता वाढत आहे. त्यामुळे आंब्याची वाढ व दर्जा घसरत चालला आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. समाधानकारक बहर न आल्याने आंबा उत्पादकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.