Nitin Gadkari: "वाजपेयी-अडवाणींच्या परिश्रमामुळेच मोदींच्या नेतृत्त्वात देशात भाजपची सत्ता"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:19 PM2022-08-22T16:19:38+5:302022-08-22T16:22:04+5:30
मी पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रयाला गेलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाची खराब हालत होती
नागपूर - काही दिवसांपूर्वीच भाजपची संसदीय समिती जाहीर झाली, त्यात पक्षाचे पहिल्या फळीतील नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यानंतर गडकरींचे पंख छाटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर अद्याप गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, एका कार्यक्रमात विकासकामांच्या दिरंगाईवर बोलताना नितीन गडकरी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. आता, नागपूरच्या रेशीमबागेत भाजपच्या एक कार्यक्रमाला संबोधित नितीन गडकरींनी अटबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या आठवणी जागवल्या.
मी पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रयाला गेलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाची खराब हालत होती. अटलजी भाषणासाठी उभे राहिले होते, ते म्हणाले. मी पाहतोय समुद्रात सूर्य बुडत आहे, पण हा काळोख निघून जाईल. सूर्य पुन्हा उगवेल आणि कमळ नक्कीच उगवेल. त्यावेळी, अनेकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि आज तो दिवस उगवला. अटलजी, अडवाणीजी, दिनदयाल उपाध्यायजी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठं काम केलं. त्यामुळे, मोदींच्या नेतृत्वात आपली सत्ता आली, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं.
देशासह राज्यातही आपली सत्ता आली. तो राजकीय विषय आहे. पण, सामाजिक कार्यातूनही एक दिवस नक्कीच असा येईल. देशातून गरिबी, भूकमारी, बेरोजगारीपासून मुक्ती मिळेल. आपण, सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हाल. आपण देशातील आदर्श नागरिक बनला, देशातील सर्वच नागरिकांना तुमचा अभिमान वाटेल, तो दिवस आता दूर नाही, असेही गडकरी यांनी म्हटले.
सरकारला घरचा अहेर
दरम्यान, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या 'NATCON 2022’ कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले होते, ''बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे, वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही,'' असा घरचा आहेर गडकरी यांनी दिला.