नागपुरातील उद्योजकाच्या नावे लंडनमध्ये डमी अकाऊंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:16 PM2021-07-31T23:16:25+5:302021-07-31T23:16:47+5:30
येथील एका मोठ्या उद्योजकाचे यूकेतील सायबर गुन्हेगाराने मेल हॅक केले. त्याआधारे लंडनमध्ये बनावट अकाऊंट उघडून त्यात रशियातील एका आयातदार कंपनीचे ३ कोटी ४८ लाख रुपये वळते करून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील एका मोठ्या उद्योजकाचे यूकेतील सायबर गुन्हेगाराने मेल हॅक केले. त्याआधारे लंडनमध्ये बनावट अकाऊंट उघडून त्यात रशियातील एका आयातदार कंपनीचे ३ कोटी ४८ लाख रुपये वळते करून घेतले. ३० मार्च ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान घडलेल्या या बनवाबनवीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
मोहित रोहित अग्रवाल (वय ३१) हे वर्धमाननगरात राहतात. ते देशविदेशात तांदूळ निर्यात करतात. त्यांच्या कंपनीचा तांदूळ निर्यातीसंदर्भात सेंट पिटर्सबर्ग रशिया येथील एका कंपनीसोबत करार झाला होता. त्यानुसार अग्रवाल यांनी रशियाला माल सप्लाय केला. अपेक्षेप्रमाणे त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीच्या संचालकांकडे चाैकशी केली. त्यानंतर तिकडून मिळालेल्या माहितीवरून अग्रवाल यांना मोठा धक्का बसला. तुमच्या कंपनीचे खाते क्रमांक बदलले. त्या खात्यात रक्कम जमा करण्यासंबंधीचा मेल तुमच्या कंपनीकडून आला होता. त्यामुळे आम्ही कधीचेच ३ कोटी ४८ लाख ६१,०२५ रुपये तुमच्या नवीन खात्यात जमा केल्याचे त्यांनी अग्रवाल यांना सांगितले. अग्रवाल यांनी नंतर पोलिसांच्या मदतीने त्या खात्याची चाैकशी केली असता हे खाते लंडनमधील बँकेत उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे कळाल्याने अग्रवाल यांनी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पोलिसांपुढे आव्हान
पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला असून, मेल हॅक करून बनावट बँक खाते उघडणारे सायबर गुन्हेगार लंडनमधील की आणखी दुसऱ्याच ठिकाणचे, ते शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे.