लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे लग्न समारंभावर यावर्षी खऱ्या अर्थाने विघ्न आणले. विषाणूचा सामूहिक प्रादुर्भाव होण्याची भीती पाहता लॉकडाऊन काळात लग्नसोहळ्यासारख्या सार्वजनिक समारोहवर बंदी घालण्यात आली आणि अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. परिस्थितीच तशी असल्याने पर्याय नव्हता. त्यामुळे अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने शहरातील इंदोरा मोठा बुद्ध विहार येथे २० जोडप्याने आपले लग्नकार्य उरकून घेतले.विहाराच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कुणीही लग्नासाठी संपर्क साधला नाही. त्यानंतर मात्र लोकांनी लग्न करून घेण्याची विनंती केली. काहींनी साधेपणाने लग्न पार पाडून पूर्ण खर्च सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय याच विहारात घेतला. महापालिका प्रशासनाने १५-२० लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य करण्यासाठी परवानगी दिली होती. या अटींचे पालन करीत लोकांनी ठरलेले लग्नसोहळे पार पाडले.व्यवस्थापकाच्या माहितीनुसार विहारात आतापर्यंत २० जोडप्यानी लग्न केले. यावेळी विहार प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क, सॅनिटायझरच्या वापरापासून सुरक्षित अंतर पाळण्याचे बंधन घालण्यात आले. सुरुवातीला १०-१५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मनपाने ५० लोकांच्या उपस्थितीची संधी दिली असली तरी आम्ही ते टाळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या २० जोडप्यामध्ये केवळ बौद्ध समाजाचा समावेश नसून अनेक धर्माच्या जोडप्यानी विहारात विवाह उरकून घेतला. हो पण विवाह बौद्ध पद्धतीनेच लावण्यात आले. यात नागपूर शहरच नाही तर जिल्ह्यातील आसपासच्या परिसरातील जोडप्यांचा समावेश होता. शिवाय एकदोन प्रेमीयुगलांचाही समावेश होता. याबाबतची सर्व माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन काळात नागपूरच्या इंदोरा बुद्ध विहारात लागले २० लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 8:46 PM
अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने शहरातील इंदोरा मोठा बुद्ध विहार येथे २० जोडप्याने आपले लग्नकार्य उरकून घेतले.
ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन : सर्व धर्मीयांचा समावेश