जनरेटरमध्ये केस अडकल्याने त्वचेसह कानही बाहेर; अडीच महिने उपचार, डॉक्टरांमुळे जीवनदान
By सुमेध वाघमार | Published: March 30, 2024 10:08 PM2024-03-30T22:08:58+5:302024-03-30T22:09:52+5:30
मेडिकलच्या डॉक्टरांचे अडीच महिने यशस्वी उपचार : १० वर्षीय मुलीचा वाचला जीव
नागपूर : घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनेरटरमध्ये अडकून ओडल्या गेले. के सासकट त्वचा निघाली. डावा कानही निघाला. कवटी दिसू लागलेल्या अवस्थेत तिला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. तब्बल अडीच महिने डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी उपचार केले. तिला नवे आयुष्य दिले.
कामठी येथील रहिवासी मानवी ईश्वर इंगोले त्या मुलीचे नाव. १४ नोव्हेंबर रोजी ती घराजवळ खेळत होती. बाजूलाच एक जनरेटर सुरू होते. खेळताना अचानक ती जनरेटर जवळ गेली.. जनरेटरच्या पट्ट्यामध्ये तिचे केस अडकले. ती जनरेटरमध्ये ओढल्या गेली. तिच्या किंचाळ्याने तत्काळ जनरेटर बंद करण्यात आले. परंतु तोपर्यंत डोक्यावरची केसासहित संपूर्ण त्वचा निघाली होती. रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. श्रीकांत पेरका, सर्जन डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ. संगावार, डॉ. अफ्रीन, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अक्षय आणि इतरही डॉक्टरांच्या चमुने शर्थीचे उपचार करून मानवीला नवे जीवन दिले.
तीन टप्प्यात स्किन ग्राफ्टींग
‘लोकमत’शी बोलताना डॉ. पेरका यांनी सांगितले, मुलीचे डोक्याचे हाड उघडे पडले होते. तिच्या डोक्याची त्वचा जोडण्याचा प्रयत्नही केला. परंतु रक्त वाहिन्या आंकुचित झाल्याने ते शक्य झाले नाही. त्यानंतर मुलीला खूप ड्रेसिंग लागले. तिच्या हाडावर मास येण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिन टप्प्यात स्किन ग्राफ्टींग करण्यात आली. यात त्वचेचा तुकडा एका भागातून काढून दुसºया भागात प्रत्यारोपित केला जातो.
लवकरच कृत्रिम कान लावला जाईल
हा अपघात एवढा भीषण होता की तिचा डावा कानही उपटून निघाला होता. तिचा कान निकामी झाला आहे. आता लवकरच तिला कृत्रिम कान लावला जाईल. ज्यामुळे तिला चष्मा घालता येईल, दिसायलाही बरे दिसेल, असेही डॉ. पेरका यांनी सांगितले.
हेअर ट्रान्सप्लांट शक्य नाही
डोक्यावरील त्वचा पूर्णत: निघाल्याने ‘हेअर ट्रान्सप्लांट’ शक्य नाही. तिला विग वापरावा लागेल. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. जीव वाचला हे महत्त्वाचे. या मुलीला २६ जानेवारी रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. शुक्रवारी ती फालोअपसाठी आली असताना ती पूर्णत: बरी झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना देण्यात आली. त्यांनी मुलीची आस्थेने चौकशी केली. तसेच सर्व डॉक्टरांचे कौतुक ही केल्याचे डॉ. पेरका म्हणाले.