भूकंपाची हॅटट्रिक, ही संकटाची चाहुल तर नाही ना? केंद्र उमरेड तालुक्यात
By निशांत वानखेडे | Published: May 5, 2024 06:10 PM2024-05-05T18:10:58+5:302024-05-05T18:11:42+5:30
केंद्र उमरेड तालुक्यात, तीव्रता २.७ वर : प्रशासन म्हणते, धाेका नाहीच
नागपूर : रविवारी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे साैम्य धक्के बसले. उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड या गावांच्या मध्ये भूकंपाचे केंद्र हाेते व रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.७ नाेंदविण्यात आली. ही भूकंपाची हॅटट्रिक ठरली असल्याने ही येणाऱ्या माेठ्या संकटाची चाहुल तर नाही ना, असा भीतीयुक्त सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी भूगर्भातील हालचालींचा कंप अनुभवण्यात आला. भूविज्ञान मंत्रालयाच्या भूकंप विज्ञान केंद्राने दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी या भूकंपाची नाेंद केली. शनिवारी कुहीनंतर आज उमरेड तालुक्यातील आमगाव या गावाजवळ भूकंपाचे केंद्र हाेते व त्याची खाेली ५ किलाेमीटरवर हाेती.
भूकंपाची तीव्रता कमी असल्याने याची जाणीव नागरिकांना झाली नाही. मात्र सलग तिसऱ्या दिवशी या भूकंपाची नाेंद झाल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी पारशिवनी, शनिवारी कुही व रविवारी उमरेड तालुक्यात भूकंपाचे केंद्र आहेत. तसा नागपूर जिल्ह्यात भूकंपाची ही चाैथी घटना आहे. यापूर्वी २६ मार्च राेजी जिल्ह्यात सलग दाेनदा धरणीकंप झाल्याची नाेंद करण्यात आली. त्यावेळी रिश्टर स्केलवरील तीव्रता २.८ एवढ्या क्षमतेची हाेती. अशाप्रकारे सातत्याने हाेणाऱ्या घटनांमध्ये नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.
नागरिकांमध्ये भीती असली तरी प्रशासनाकडून भविष्यात भाैगाेलिक आपत्तीचा इनकार केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते अशाप्रकारे साैम्य स्वरुपाचे धक्के ही धाेकदायक बाब नाही. दुसरीकडे केंद्रीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानेही ही भूगर्भातील सामान्य घडामाेड असल्याचे म्हटले आहे. नागपूरचा भूगर्भ परिसर सलग एका प्लेटने बनलेला असल्याने कुठल्याही भूकंपाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहेल. मात्र काही अनावश्यक हालचालींमुळे साखळीने भूकंप घडत असल्याचे जीएसआयच्या एका वैज्ञानिकांनी स्पष्ट केले.
खाणीतील हालचाली भूकंपाचे कारण?
जिल्ह्यात झालेले भूकंपाचे चारही धक्के खाणकाम असलेल्या भागात झाले आहेत. पारशिवनी भागात काेळसा खाण, कुही भागात काळ्या दगडाच्या खाणी तर रविवारी उमरेड तालुक्यात झालेला भूकंपाचे केंद्र हे वेकाेलि काेळसा खाणीच्या भागात आहे. यामुळे खाणीमध्ये उत्खननासाठी हाेणाऱ्या स्फाेटांमुळे हादरे बसत असल्याचे बाेलले जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जीएसआयच्या वैज्ञानिकांनी यावर भाष्य केले नाही.
या विभागांकडून काेणत्या हालचाली?
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पहिल्या दिवशी झालेल्या भूकंपाबाबत सर्वेक्षण करून अहवाल सरकारकडे पाठविल्याचे सांगितले.
- भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यामुळे जीएसआयने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण सलग भूकंप हाेत असल्याने त्यांनीही हालचाली सुरू केल्याचे सुत्राकडून समजते.
- भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे हाेणाऱ्या भूकंपाबाबत तपास व अभ्यास केला जात असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.