लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. खा. भावना गवळी यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना चुकीची माहिती दिली. त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे पवार यांनी तपास यंत्रणांच्या बाबतीच चुकीचे व संभ्रम फैलावणारे वक्तव्य केले, असा आरोप वाशिम येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख हरीश सारडा यांनी बुधवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी खा. गवळी यांनी शरद पवार व महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत सारडा यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, रिसोड जि. वाशिम येथील श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड हा तब्बल १०० कोटीचा कारखाना भावना गवळी यांनी केवळ २५ लाख रुपयांत स्वत:चेच स्वीय सचिवांच्या भावना ॲग्रो प्रॉडक्ट ॲण्ड सर्व्हिसेस या बेनामी कंपनीच्या नावे केला. हा घोटाळा आपण उघडकीस आणला. तेव्हापासून मला सातत्याने धमकीचे फोन येताहेत. दोन वेळा माझ्यावर हल्लासुद्धा झाला आहे. पोलिसांमध्ये तक्रार दिली, परंतु काही झाले नाही. वाशिम पोलिसांचे खा. गवळी यांना पाठबळ आहे. या घोटाळ्याची तक्रार मी ईडीकडे केली होती. त्यानुसार ईडीने वाशिम, रिसोड, पाथरी औरंगाबाद, मुंबई व यवतमाळ येथे धाडी टाकून चौकशी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.