फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 19, 2024 09:15 PM2024-03-19T21:15:29+5:302024-03-19T21:15:40+5:30
- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ
नागपूर: केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात गेल्यावर्षी कपात केली. ही कपात मार्च-२०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी १५ दिवसांपासून भडकले आहेत. सर्व खाद्यतेलात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे.
होळी आणि रमजान महिन्यामुळे पाम तेलाचे दर मलेशिया देशातच महाग झाले आहेत. रमजान ईद साजरी होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाहीच. ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी होतील. पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम सर्व तेलाच्या दरवाढीवर झाल्याने लोकांना सध्यातरी जास्त दरातच खाद्यतेल खरेदी करावे लागेल, अशी शक्यता इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली.
भारतात पाम तेलाची सर्वाधिक आयात होते. सध्या रमजान महिना असल्याने जगभरातील मुस्लीम देश मलेशियातून पाम तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे पाम तेलाचे दर जागतिक स्तरावर वधारले आहेत. या तेलामुळे अन्य खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून दरवाढ सुरू असून मार्च अखेरपर्यंत राहील. त्यानंतर अर्थात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मलेशियात दर कमी होताच भारतातही खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
आयात शुल्क कपातीचा तेलबियाच्या बाजारावर परिणाम
केंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मार्च १५ रोजी अधिसूचना काढल्याने मार्च २०२५ पर्यंत कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफुल तेलावर ५.५० टक्के आणि रिफाईंड तेलावर १३.७५ टक्के आयातशुल्क राहणार आहे. मागील हंगामात याच पातळीवर आयातशुल्क होते. त्यामुळे विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. आयात वाढल्याचा दबाव देशातील तेलाच्या भावावर झाला. पुढे असेच निर्णय होत राहिल्यास देशातील शेतकरी तेलबिया उत्पादनापासून परावृत्त होऊ शकतात. ही देशासाठी चिंतेची बाब होऊ शकते, असे तेल बाजारातील अभ्यासकांचे मत आहे. भारतात पाम तेलाची आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून होते. सोयातेलाची आयात अर्जंेटिना आणि ब्राझीलमधून, सूर्यफुल तेल रशिया आणि युक्रेन देशातून होते.
खाद्यतेल सध्या १५ दिवसांआधी
सोयाबीन ११५ १०५
पाम ११५ १००
राईस ११२ १००
सूर्यफूल ११५ १०५
शेंगदाणा १७६ १७२
मोहरी १३० १२०
जवस १२० १२०
वनस्पती १३० ११५