लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांची जबाबदारी ही केवळ वर्गखोलीपुरतीच मर्यादित नाही. समाज व देशाचे भविष्य घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. शिक्षकी पेशा एक ‘मिशन’ प्रमाणे आहे. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी कुणी शिक्षक होत असेल तर तो चुकीचे पाऊल उचलत आहे. शिक्षकी पेशा हा पैसा कमविण्याचे नव्हे तर देश घडविण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले. गुरुवारी शिक्षक दिनानिमित्त विद्यापीठातील उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते. आधुनिक शिक्षणप्रणालीत शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाचादेखील वापर वाढला आहे. विविध ‘ई-लर्निंग’च्या माध्यमातून ज्ञान मिळविता येते. मात्र तरीदेखील शिक्षकांचे महत्त्व कायम आहे. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडत असतो. त्यामुळे शिक्षकांनी आपली नेमकी जबाबदारी ओळखायला हवी, असे डॉ.काणे म्हणाले. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानरुपी नाळ जुळणे आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या मनात आदर निर्माण करून विषयाप्रति गोडी निर्माण करणारा व वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाराच यशस्वी शिक्षक असतो, असे मत नंदा जिचकार यांनी व्यक्त केले. डॉ.विनायक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.नीरज खटी यांनी आभार मानले.यांचा झाला सन्माननागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.दीपक बारसागडे व प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.के.एस.झाकीउद्दीन यांना उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिलिंद उमेकर यांना उत्कृष्ट प्राचार्य तर नागपूर विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सेरिकल्चर अॅन्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्च’ येथील प्राध्यापक डॉ.एम.एम.राय यांना उत्कृष्ट संशोधक या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उर्मिला डबीर यांना डॉ.आर.कृष्णकुमार सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.डॉ.दीपक बारसागडे यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करताना नंदा जिचकार. यावेळी मंचावर डॉ.सिद्धार्थविनायक काणे, डॉ.विनायक देशपांडे, डॉ.निरज खटी व डॉ.राजू हिवसे उपस्थित होते.