कोरोनाचा प्रभाव : वैद्यकीय पीजी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:08 AM2020-04-04T00:08:07+5:302020-04-04T00:10:27+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा १५ ते २२ जून २०२० या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा १५ ते २२ जून २०२० या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एससी अभ्यासक्रम आदी अभ्यासक्रमांची परीक्षा १२ मे २०२० पासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड)अध्यक्ष डॉ. राहुल वाघ व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना व विद्यापीठाला यासंदर्भात निवेदन दिले होते. याबाबत डी.एन.बी. व इतर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय ‘पीजी’ अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
सुधारित वेळापत्रकानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा ‘पेपर-१’ १५ जून २०२० रोजी, ‘पेपर-२’ १७ जून, ‘पेपर-३’ १९ जून आणि ‘पेपर-४’ २२ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निश्चित करून देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. तसेच ‘सत्र-२’ च्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज विद्यापीठात विना विलंब शुल्कासहीत सादर करण्यासाठी ५ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ८ मे २०२० आणि अति विलंब शुल्कासहीत १२ मे २०२० पर्यंत विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोना रुग्णसेवेत पीजी विद्यार्थी
कोरोना (कोविड-१९) विषाणूच्या संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (पीजी) विद्यार्थ्यांची मदत होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मे-२०२०’ उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून घेण्यात येणार आहेत.
-डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ