आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 03:36 PM2021-09-21T15:36:39+5:302021-09-21T15:38:52+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
ही याचिका मतदार सादुकर हटवार यांनी दाखल केली होती. सावरकर यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक लढण्याकरिता नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वारसदार, त्यांची मालमत्ता, स्वत:ची मालमत्ता, बँक खाती, गहाण मालमत्ता व विविध प्रकारच्या कर्जांची माहिती लपवून ठेवली. असे असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैधपणे स्वीकारले.
सावरकर यांनी संबंधित माहिती लपवून ठेवल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. परिणामी, ते ११ हजार ११६ मतांनी विजयी झाले. करिता, त्यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी व कामठी मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे हटवार यांचे म्हणणे होते. परंतु, त्यांचे मुद्दे न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. हटवार यांच्यातर्फे ॲड. आर. एम. भांगडे, तर सावरकर यांच्यातर्फे ॲड. हरीश डांगरे यांनी कामकाज पाहिले.
मुद्दे मोघम, निराधार, अस्पष्ट
हटवार यांनी याचिकेमध्ये कोणतेही ठोस मुद्दे मांडले नाही. याचिकेतील सर्व मुद्दे मोघम, निराधार व अस्पष्ट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत नाही. याशिवाय, हटवार यांनी याचिकेत दिलेली माहिती कुठून मिळविली, माहितीचा स्त्रोत काय आहे हे सांगितले नाही. याचिकेची दखल घ्यावी असे कोणतेच कारण रेकॉर्डवर उपलब्ध नाही, असे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले.