निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:38 AM2018-04-22T00:38:13+5:302018-04-22T00:38:25+5:30
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘भारतीय लोकतंत्र सार्थक चुनाव का मंत्र’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून असित सिन्हा बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर व अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क उपसंचालक राधाकृष्ण मुळी, पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग, अतुल त्रिवेदी आदी उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे जवळपास सारखेच असतात. परंतु ‘कथनी व करनी’ यात फरक आहे. राजकारणात स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनी येण्याची गरज आहे. विविध घटकांत संवाद असला पाहिजे. संविधानाला समानता अभिप्रेत आहे. परंतु आज निवडणुका पैशाच्या बळावर लढल्या जातात. मतदान यंत्रामुळे देशातील नागरिक चिंतित आहेत. अशापरिस्थितीत देशातील लोकशाही बळकट होणार नसल्याचे असित सिन्हा म्हणाले.
आपल्या देशाची संसदीय मार्गानेच प्रगती झाली आहे. दैनंदिन जीवनात लोकशाहीची मूल्ये जपली तर देशातील लोकशाही बळकट होण्याला मदत होईल. जगात लोकशाहीपेक्षा दुसरी कोणतीही व्यवस्था प्रभावी नाही, असे विचार राधाकृष्ण मुळी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. प्रारंभी पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग यांनी प्रास्ताविकातून भारतीय लोकशाही व अभिप्रेत निवडणूक प्रक्रिया तसेच संस्थेच्या कामकाजावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन अतुल त्रिवेदी यांनी तर आभार संस्थेचे सदस्य सुधीर जाधव यांनी मानले. यावेळी शोभा धनवटे, नरेश मेश्राम, यशवंत मोहिते, योगश विटणकर, रवींद्र मिश्रा यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
कोल्हटकर व देशमुख यांचा गौरव
राष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमात उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर व एम.एस.देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊ न गौरव करण्यात आला.