नागपूर : थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापू नये, या मागणीवरून होणाऱ्या आंदोलनानंतर आता महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीने विनंतीची मुदत संपल्यानंतर कठोर कारवाई सुरू केली आहे. नागपूर शहर विभागांतर्गत २०० पेक्षा जास्त वीज कनेक्शन कापण्यात आले आहेत. या कारवाईने थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बहुतांश थकबाकीदार कोरोना महामारीमुळे आर्थिक स्थिती खालावल्याचा हवाला देत कारवाई न करण्याची विनंती करीत आहेत. काही ठिकाणी ग्राहकांची गोंधळ घातल्याची माहिती पुढे आली आहे.
संपूर्ण राज्यात ग्राहकांवरील थकीत रक्कम वाढून ७१,५०६ कोटींवर पोहोचली आहे. डिसेंबर २०२० पर्यंत नागपूर शहर विभाग (शहर व हिंगणा/बुटीबोरी) अंतर्गत घरगुती ग्राहकांवर २४७.३५ कोटी, वाणिज्यिकवर ४९.७० कोटी आणि औद्योगिक ग्राहकांवर २८.०५ कोटी रुपये थकीत आहेत. कोरोना महामारीमुळे कनेक्शन न कापण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. पण आता मुदत संपल्यानंतर महावितरणने वीजबिल न भरणाऱ्यांवर कनेक्शन कापण्याची नोटीस जारी केली आहे. १५ दिवसांचा नोटीस कालावधी संपल्यानंतर महावितरणने सोमवारपासून वीज कनेक्शन कापण्यास प्रारंभ केला आहे. नागपूर शहरात दोन दिवसात २०० पेक्षा जास्त कनेक्शन कापले आहेत.
लाईनमनला मीटर रूममध्ये केले बंद
वीज कनेक्शन कापण्याच्या मोहिमेला शहरात अनेक भागात विरोध झाला. अशीच घटना गांधीसागर येथील विदर्भ प्रीमियर सोसायटीत घडली. थकबाकीदाराची वीज कापण्यासाठी पोहोचलेले लाईनमन गजानन ताजने यांना धमकी देऊन मीटर रूममध्ये बंद केले. ताजने यांनी या घटनेची माहिती कनिष्ठ अभियंत्याला दिली. पोलीस कारवाई करण्याच्या धमकीनंतर ग्राहकाने ताजने यांना २० मिनिटानंतर सोडले.
वसुली वाढली
कनेक्शन कापण्याची नोटीस जारी केल्यानंतर महावितरणची वसुली वाढली आहे. नागपूर शहर विभागात २०२१ मध्ये ११२ टक्के वसुली झाली आहे. कंपनीने या महिन्यात १०९.६६ कोटी रुपयांचे बिल जारी केले आहे. पण वसुली १२३.१६ कोटी रुपयांची झाली आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत १४७.२ कोटी रुपयांच्या बिलाच्या बदल्यात १३५.१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अर्थात ९१.७८ टक्के वसुली झाली आहे. कठोर कारवाईमुळे वसुली वाढली आहे.
जिल्ह्यात ३,२१,४३३ ग्राहकांवर कारवाईचे संकट
महावितरणने जिल्ह्यातील ३,२१,४३३ ग्राहकांना वीज कापण्याची नोटीस दिली आहे. यापैकी नागपूर शहरात २,०५,९९२ आणि ग्रामीण भागात १,१५,४४१ ग्राहक आहेत. सर्वांची नोटीसाची मुदत संपली आहे. थकित रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापण्यात येणार आहे. वीज कनेक्शन कापण्याची व्यापक मोहीम सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.