दिवाळीआधीच वीज संकट; राज्यातील नऊ युनिट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:13 AM2018-10-27T10:13:55+5:302018-10-27T10:16:02+5:30
कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.
कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.
महाजेनकोच्या अहवालानुसार भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, चंद्रपूर वीज केंद्रातील ५, ३, ८ आणि ९, खापरखेड्यातील १, कोराडीतील ६ आणि ७ तर परळी येथील ७ क्रमांकाच्या युनिटमधील वीज उत्पादन कोळशाअभावी रोखण्यात आले आहे. त्याचप्रकारे भुसावळ येथील ४,५, चंद्रपूर येथील ४,६,७, कोराडीतील ८,९,१० आणि पारस येथील ४ क्रमांकाच्या युनिटचे उत्पादन प्रभावित झाले आहे. दुसरीकडे परळी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ४ व ५ ला वित्तीय कारणांमुळे बंद ठेवले आहे. चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, पारस आणि परळी येथील १-१ युनिट तांत्रिक त्रुटीमुळे बंद ठेवले आहे.
दिवाळी तोंडावर असताना विजेचे हे संकट उभे ठाकले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रात १०,१७० मेगावॉट क्षमतेच्या ऐवजी केवळ ५१३२ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पॉवर एक्सचेंजमधून महागड्या दरावर ३४०५ मेगावॉट वीज खरेदी करावी लागत आहे. प्रदेशातील खासगी वीज आणि केंद्रीय ग्रीडच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. यानंतरही मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुंबई वगळता राज्यात २०,४७४ मेगावॉट इतकी विजेची मागणी होती. तर पुरवठा केवळ १३,७७२ इतका होत आहे. परिणामी राज्यातील ग्रामीण भागातील विशेषत: अधिक हानी असणारे जी १, जी २ आणि जी ३ क्षेत्रात लोडशेडिंग केली जात आहे.
१५ हजार मेट्रिक टन कोळशाची रस्त्याने वाहतूक
कोळशाच्या कमतरतेमुळे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सूत्रानुसार कोळशाच्या आयातमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे महाजेनकोचे वरिष्ठ अधिकारी वेकोलि आणि रेल्वेदरम्यान समन्वय मजबूत करून कोळसा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोळसा खदानीतून रस्ते मार्गाने रोज १५ हजार मेट्रिक टन कोळशाची वाहतूक महाजेनको करीत आहे.
किती पुरेल कोळसा?
राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रातील कोळशाच्या साठ्याबाबत अतिसंवेदनशील स्थिती आहे. कोराडीमध्ये चार दिवस, नाशिक, परळी, पारस आणि चंद्रपूरमध्ये एक दिवसाचा कोळशाचा साठा आहे. खापरखेडा आणि भुसावळ हेसुद्धा प्रत्येकी अडीच दिवसाच्या साठ्यासह संवेदनशील स्थितीत आहेत.