नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वर्ष २०१६ पासून मिळणारी वीज सबसिडी गेल्या चार महिन्यांपासून न मिळाल्याने उद्योजक संकटात आले आहेत. राज्याच्या वित्त मंत्रालयाने सबसिडीचा पैसा न दिल्याने सबसिडी थांबविल्याचे सांगण्यात येत आहे. पण, सबसिडीअभावी स्थानिक उद्योग लगतच्या राज्यांमध्ये स्थलांतरित करण्याच्या तयारीत असून विदर्भावर अन्याय होत असल्याची उद्योजकांची ओरड आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सबसिडी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन उद्योजकांची संघटना विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनला दिले होते. पण चार महिने वाट पाहूनही सबसिडी सुरू झालेली नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रारंभी सन २०१६ ते २०१९ या तीन वर्षांसाठी राज्याने वीज सबसिडी दिली होती. त्यानंतर २०१९ ते २०२४ पर्यंत सबसिडीची तारीख वाढविली. महाविकास आघाडीने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी असलेली सबसिडी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी वाढविली. वार्षिक १२०० कोटींची मिळणारी सबसिडी डिसेंबर २०२१ मध्येच संपली. लघुऐवजी मोठ्या उद्योगांना सबसिडीचा जास्त फायदा झाला. त्यानंतर मार्च २०२१ पर्यंत तीन महिने सबसिडी मिळालीच नाही. २०२१ मध्ये एप्रिलनंतर चार महिने सबसिडी दिलीच नाही. पुन्हा सबसिडी सुरू केल्यानंतर उद्योगांना दोन महिन्यांची सबसिडी मिळू लागली. पण आता गेल्या चार महिन्यांपासून सबसिडी न मिळाल्याने खेळते भांडवल आणि उद्योगांवर आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नवीन उद्योग या भागात येण्यास उत्सुक नाहीत.
व्हीआयएचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन; वित्तमंत्र्यांना लिहिले पत्र
व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांच्या नेतृत्वात शनिवारी सबसिडीसंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली आणि चार महिन्यांच्या अनुशेषासह सबसिडी सुरू करण्याची मागणी केली. त्यावेळी वित्त मंत्रालयाकडून पैसे येतील तेव्हा सबसिडी सुरू करू, असे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी वित्तमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली आहे. शिष्टमंडळात प्रवीण तापडिया, प्रफुल्ल दोशी, गौरव सारडा, गिरधारी मंत्री, पंकज बक्षी होते.
सबसिडीमुळे उद्योजकांनी वाढविली क्षमता
सुरेश राठी म्हणाले, वीज सबसिडी सुरू झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांनी गुंतवणूक करून उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. पण पूर्वसूचना न देता सबसिडी थांबविण्यात येत असल्यामुळे खेळत्या भांडवलावर परिणाम होत आहे.