घरची वीज गेली, महावितरण फोनही उचलेना; राष्ट्रवादीने मुख्य अभियंत्यांना विचारला जाब
By कमलेश वानखेडे | Published: June 2, 2023 06:18 PM2023-06-02T18:18:17+5:302023-06-02T18:18:45+5:30
Nagpur News शहरातील विविध भागात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होतो. संबंधित केंद्रावर कुणीच फोन उचलत नाही. फोन उचलला तर कर्मचारी आणि दुरुस्ती वाहन उपलब्ध नसल्याचे सांगतात, अशा तक्रारींचा पाढा वाचत नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.
कमलेश वानखेडे
नागपूर : शहरातील विविध भागात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होतो. नागरिक तक्रार करण्यासाठी फोन करतात मात्र संबंधित केंद्रावर कुणीच फोन उचलत नाही. फोन उचलला तर कर्मचारी आणि दुरुस्ती वाहन उपलब्ध नसल्याचे सांगतात, अशा तक्रारींचा पाढा वाचत नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महावितरणचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयातच निदर्शने करण्यात आली.
शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात पदाधिकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात धडक दिली. यावेळी पेठे यांनी सांगितले की, बऱ्याच भागात योग्य वीजपुरवठा होत नाही. व्होल्टेज कमी असल्यामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, कुलर काम करत नाही. हाय आणि लो होल्टेज असल्यामुळे घरगुती इलेक्ट्रिक वस्तू मध्ये बिघाड येत आहे. एखाद्या भागातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आल्यावर दुसरे ट्रान्सफॉर्मर यायला उशीर होतो. त्यामुळे जनता त्रस्त होते याचे निदान आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी मागणी वाढल्याने लोड जास्त होत असल्यामुळे ट्रांसफार्मर वाढवण्याची गरज आहे. श्रीकृष्ण नगर चौक येथे उपकेंद्र झाले आहे, त्याचे काम त्वरित सुरू करावे. करा. वाठोडा उपकेंद्रामध्ये मंजूर झालेले ट्रांसफार्मर तात्काळ लावण्यात यावे. अनमोल नगर, राधाकृष्ण नगर, हिरवी नगर, पडोळे नगर, गोपाल कृष्ण नगर देशपांडे लेआउट, शास्त्रीनगर वाठोडा गाव आदी भागातील वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी उपाय योजना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, रमण ठवकर,अफजल फारुकी, नूतन रेवतकर, शिव बेंडे, महेंद्र भांगे, रिजवान अंसारी, चिंटू महाराज, राजा बेग, जावेद खान, अश्विन जवेरी, देवेंद्र घरडे,हाजी सोहेल पटेल, तनुज चौबे, प्रशांत बनकर, विनय मुदलीयार, वसीम लाला, डॉ. मिलिंद वाचनेकर, शरद शाहू, उषा चौधरी, राजेश माटे,आशुतोष बेलेकर आदी सहभागी झाले.