लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने इलेक्ट्रिसिटी अॅक्टमध्ये संशोधन करण्यासाठी विधेयकाचे प्रारूप सादर केले आहे. वीज कामगार, अभियंता संयुक्त कृती समितीने ऊर्जा विभागाच्या या प्रारूपाच्या विरोधात एक जून रोजी काळा दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. कर्मचारी-अभियंते या दिवशी काळ्या फिती लावून विरोध दर्शवतील.कृती समितीने विधेयकाच्या प्रारूपाचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले आहे की, नवीन विधेयकामुळे ऊर्जा विभागात खासगीकरणाला वाव मिळेल. आज देश कोविड-१९ शी संघर्ष करीत आहे. परंतु केंद्र सरकार खासगीकरणासाठी हे विधेयक सादर करीत आहे. प्रस्तावित कायदा संविधानाच्या मूळ उद्देशाविरुद्ध आहे. ऊर्जा क्षेत्रावर केंद्र आणि राज्याचा संयुक्त अधिकार आहे. परंतु हे विधेयक सादर करून केंद्र सरकार मनमानी करीत आहे. आज विजेचे दर, गरिबांना स्वस्त वीज देण्यासाठी अनुदान देण्यासारखे निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत. परंतु हे अधिकार नवीन विधेयकामध्ये हिरावण्यात येणार आहेत. बिहार, झारखंड, तामिळनाडू आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही याचा विरोध करावा, अशी मागणी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे वर्कर्स फेडरेशनचे कृष्णा भोयर, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे संजय ठाकुर, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे आर.टी. देवकांत, महावीज तांत्रिक कामगार संघटनेचे सय्यद जहीरुद्दीन वीज कामगार काँग्रेसचे हिंदूराव पाटील यांनी सांगितले.
वीज कर्मचारी १ जूनला काळा दिवस पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:38 AM