गडचिरोलीतील हत्ती नेणार गुजरातमधील अंबानी प्राणीसंग्रहालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 07:00 AM2022-01-09T07:00:00+5:302022-01-09T07:00:03+5:30

Gadchiroli News कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत.

Elephants from Gadchiroli will be taken to Ambani Zoo in Gujarat | गडचिरोलीतील हत्ती नेणार गुजरातमधील अंबानी प्राणीसंग्रहालयात

गडचिरोलीतील हत्ती नेणार गुजरातमधील अंबानी प्राणीसंग्रहालयात

Next
ठळक मुद्देपर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात

 

मनोज ताजने

गडचिरोली : संपूर्ण राज्यभरात हत्तींना पाहण्यासाठी एकमेव आकर्षण असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारण कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी ही अनमोल सरकारी मालमत्ता देण्याच्या या खटाटोपाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. या खासगी प्राणिसंग्रहालयासाठी देशभरातून विविध वन्यप्राणी मागविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणचे दुर्मीळ प्राणी या प्राणिसंग्रहालयासाठी देण्याची अनुमतीही दिली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ पैकी ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत. कमलापूरमधील कोणते ४ हत्ती घेऊन जायचे हे रिलायन्सने पाठविलेले डॉक्टरच ठरवतील. त्यामुळे चांगले हत्ती गेल्यानंतर कमलापुरात शिल्लक राहणाऱ्या ३ हत्तींची वंशावळ वाढू शकली नाही तर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.

पर्यटकांचा हिरमोड होणार

कमलापूर आणि आलापल्ली येथील नैसर्गिक जंगलात ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वन विभागाकडून हत्तींचे पालनपोषण केले जाते. या हत्तींची वंशावळ वाढून कमलापुरात १० पेक्षा जास्त हत्ती झाले होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भाग असूनही राज्यभरातील पर्यटक येथे हत्तींना पाहण्यासाठी येतात आणि येथील नैसर्गिक वातावरणात रमतात; पण आता हत्ती गेल्यानंतर हा कॅम्प ओसाड पडणार आहे.

राज्य सरकारची उदासीनता

कमलापूरमधील हत्तींच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही. हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पशुवैद्यकीय अधिकारीही नाही. गेल्या दोन वर्षांत या कॅम्पमधील तीन हत्तींची पिले आजारांनी मरण पावली. राज्यात एकमेव असलेल्या या हत्ती कॅम्पकडे सरकारने लक्ष दिल्यास गडचिरोलीतील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होऊ शकते.

Web Title: Elephants from Gadchiroli will be taken to Ambani Zoo in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.