नागपूर : जिल्ह्यातील अंगणवाड्या अपग्रेड करण्यासाठी साहित्याचा पुरवठा न करताच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने एक कोटी ६ लाख रुपयांच्या देयकाची रक्कम कंत्राटदाराला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच दोन दिवसापासून कंत्राटदाराची साहित्याचा पुरवठा करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. बुधवार व गुरुवारी काही अंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्र इमारतीचे श्रेणीवर्धन (अपग्रेड) करण्यासाठी केंद्र शासनाकडून फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेला एक कोटी सहा लाख रुपये व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ६४ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. यातून अंगणवाड्या अपग्रेड करण्यासाठी स्मार्ट एलएडी टीव्ही, वॉटर क्युरिफायर, कपाट, ग्रीन नेट, हॅन्ड वॉश यासह अन्य साहित्य खरेदी करावयाचे होते. त्यानुसार ४९ अंगणवाड्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांप्रमाणे हा निधी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. पंचायत समितीस्तरावर साहित्याचा पुरवठा होण्यापूर्वीच कंत्राटदाराला ९८ लाखांचे बील अदा करण्यात आले. या प्रकरणाची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी दिले आहे.
वास्तविक कंत्राटदाराने मागणीप्रमाणे साहित्याचा पुरवठा केला आहे का, याची खात्री झाल्यानंतर पुरवठा झाला असेल त्याच साहित्याची देयके अदा करण्यात यावी असे विभागाचे आदेश आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महिला व बाल विकास समितीला या निधीचा सुगावा लागू न देता कंत्राटदाराला रक्कम अदा केली आहे. हा निधी तालुकास्तरावर रितसर खर्च झाला नसल्याची माहिती महिला व बाल विकास समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. उप आयुक्तांच्या आदेशानुसार निधी वितरित
उप आयुक्त(अंगणवाडी ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आदेशानुसार तालुका स्तरावरील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार हा निधी त्यांच्या खात्यात वळता करण्यात आला होता. दरम्यान १५ मार्चला माझी बदली झाली. तोपर्यंत कुठलीही तक्रार नव्हती. त्यानंतर काय झाले मला कल्पना नाही. साहित्याचा पुरवठा झाला की नाही याची खात्री केल्यानंतरच कंत्राटदाला बील अदा करणे अपेक्षीत होते.
-दामोदर कुंभरे, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी