लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. ऑक्टोबर संपतोय तरी प्रवेशच झालेले नाहीत, अशात शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार, आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार, अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे
४५,७१६ जागा रिक्त
शहरातील जागा - ५९१७०
नोंदणी केलेल विद्यार्थी - ४०९९०
भाग १ भरलेले विद्यार्थी - ३४८७८
ऑप्शन फॉर्म भरलेले विद्यार्थी - २९१५९
पहिल्या फेरीनंतर प्रवेश घेतला - १३४५४
३० हजारावर जागा राहणार रिक्त
राज्यात पाच शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीमार्फत होत आहे. नागपूर जिल्ह्यात केवळ शहरासाठी ही मर्यादित आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशन मिळत आहे. आरक्षणाच्या निकालामुळे शहरातील प्रवेश लांबल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळले आहे. त्यामुळे यंदा शहरातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहे. गेल्यावर्षी २१ हजार जागा रिक्त होत्या. यंदा ही आकडेवारी ३० हजारावर जाणार आहे. याच पटसंख्येवर संचमान्यता दिल्यास मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे.
केंद्रीय प्रवेश पद्धतीने जेव्हापासून अकरावीच्या प्रवेशाला सुरूवात झाली तेव्हापासून कॉलेजमध्ये रिक्त जागांची संख्या वाढत आहे. मुख्याध्यापक स्तरावर प्रवेशाला परवानगी द्यावी, अशी आमची मागणीही होती. त्याला दुजोरा दिला नाही. यंदा तर मोठ्या संख्येने जागा रिक्त राहणार असल्याने, शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे.
डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा.