लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वीज कंपन्यांमधील कर्मचारी व कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा रविवारी जट्टेवार सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष नागोराव मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, संघटनेचे राज्य सचिव भाऊसाहेब भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
वीज कंपन्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सकारात्मक आहे. गेल्या काही वर्षांपासून वीज कंपन्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत सर्व कामगार संघटनांशी चर्चा करून मार्ग काढू, असे प्रतिपादन राऊत यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी केले. यावेळी रक्षाबंधनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी राऊत यांना राख्या बांधल्या.