मेळघाटात टाकाऊ घाणेरी होणार आदिवासींसाठी रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:53 AM2017-11-16T10:53:24+5:302017-11-16T10:55:05+5:30

टाकाऊ घाणेरीपासून फर्निचर आणि शोभिवंत वस्तू निर्मितीचा एक अभिनव प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. विशेष म्हणजे परिसरातील आदिवासींना यातून रोजगारही उपलब्ध होत आहे.

Employment opportunities for tribals to be destroyed in Melghat | मेळघाटात टाकाऊ घाणेरी होणार आदिवासींसाठी रोजगाराचे साधन

मेळघाटात टाकाऊ घाणेरी होणार आदिवासींसाठी रोजगाराचे साधन

Next
ठळक मुद्दे जंगल स्वच्छता मोहिमेलाही हातभार

सविता देव हरकरे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर: देशभरात स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शहरे आणि गावांची स्वच्छता करण्याचा चंग शासनाने बांधला असतानाच वनक्षेत्रांमध्येही अशा स्वच्छतेची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे आणि ही स्वच्छता करीत असताना वनांमधून निघणाऱ्या कचऱ्यापासून कलात्मक निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर अधिक उत्तम.
टाकाऊ घाणेरीपासून फर्निचर आणि शोभिवंत वस्तू निर्मितीचा असाच एक अभिनव प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. विशेष म्हणजे परिसरातील आदिवासींना यातून रोजगारही उपलब्ध होत आहे.
विदर्भाच्या गावागावात व गावाबाहेरील जंगलांमध्ये घाणेरी म्हणजेच रायमुनिया या तण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीने उच्छाद मांडला आहे. घाणेरी पसरायला लागली की गवत वाढत नाही. घाणेरी पसरलेल्या भागात पाळीव गुरांना व वन्यप्राण्यांना चारा मिळेनासा होतो.
घाणेरीचे हे धोके लक्षात घेता वनविभाग व व्याघ्र प्रकल्प, मेळघाटमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर घाणेरी निर्मूलनाचे काम हाती घेत असते.
परंतु आता हीच टाकाऊ घाणेरी मेळघाटमध्ये स्थानिक निसर्ग संरक्षण संस्थेच्या प्रयत्नातून आदिवासींसाठी रोजगाराचे साधन होत आहे. निसर्ग संरक्षण संस्था, अमरावती व सातपुडा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे या कार्यात पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे सर्वप्रथम इ.स. २००७ साली नागपूर जिल्हा व मध्य प्रदेशांतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पात हा प्रयोग करण्यात आला होता.
त्यानंतर २०१२ साली होशंगाबाद जिल्ह्यातील मटकुली (पचमढी) येथे तर या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याद्वारे गावातील ७८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष व या संकल्पनेचे प्रणेते किशोर रिठे यांनी यावर्षी हा यशस्वी प्रयोग मेळघाटमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आणि अलीकडेच आयोजित शिबिरात आदिवासी तरुणतरुणींना घाणेरीपासून नानाविध आकर्षक, शोभिवंत वस्तू आणि फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. मध्य भारतात प्रथमच सातपुडा फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून देशभरात त्याचे अनुकरण झाल्यास जंगलांमधील कचरा स्वच्छ होण्यासोबतच त्यापासून परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

या वस्तू अतिशय देखण्या व टिकाऊ आहेत. त्यांना आता बाजार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी


मेळघाटमध्ये तयार झालेल्या या आकर्षक वस्तू मुठवा समुदाय केंद्रात लवकरच उपलब्ध होतील यासाठी आता आम्ही प्रयत्न करू.
- डॉ. निशिकांत काळे,निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष

Web Title: Employment opportunities for tribals to be destroyed in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.