नागपूर : महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. उलट राज्यातील १६ वीज वितरण खाजगी कंपन्यांकडे सोपविण्याचे पाऊल उचलण्यात आले. यात नितीन राऊत यांचा स्वार्थ असल्याचा आरोप महावितरणचे माजी संचालक, भाजपचे माजी प्रवक्ते विश्वास पाठक व वीज ग्राहक कार्यकर्ते प्रताप होगाडे यांनी केला आहे.
राऊत ऊर्जा मंत्रालय हाताळण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत. त्यांनी सक्षम व्यक्तींना कामकाजाच्या प्रक्रियेतून दूर केले व त्यांच्या जागी स्वत:च्या पसंतीच्या अकार्यक्षम व्यक्तींना नियुक्त केले. यामुळेच महावितरणच्या थकबाकीत मोठी वाढ झाली आहे. अकार्यक्षम व्यवस्थापन आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे परवानाधारकांची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पाठक म्हणाले.
कंपनीच्या दाव्यानुसार महावितरणचा तोटा १५ टक्के नव्हे तर प्रत्यक्षात ३० टक्के इतका होता. हा १५ टक्क्यांचा फरक भ्रष्टाचाराशिवाय काहीच नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप होगाडे यांनी केला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम केल्यास कंपनी अजूनही नफा कमवू शकते. तथापि, मंत्र्यांना त्यात स्वारस्य नाही आणि महसूल निर्माण करणारी क्षेत्रं विकून महावितरणला दिवाळखोरीकडे नेण्याचा त्यांचा मानस आहे, असेदेखील होगाडे म्हणाले.