नागपूर : शहरातील रस्ते अपघातांवर नियंत्रण आलेले नसून, नियमांचा भंग करणाऱ्यांमुळे इतरांच्या जिवावर संकट येते. मागील २४ तासांत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला. अशोक चौक व रचना मेट्रो स्थानकाजवळ हे अपघात झाले.
पहिली घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणा टी पॉईंट येथील रचना मेट्रो स्थानकाजवळ घडली. मंगळवारी सव्वाबाराच्या सुमारास रस्त्यावर एमएच ३१-एफसी-४७४३ हा ट्रक उभा होता. अंधारात ट्रक उभा ठेवला असतानादेखील चालकाने दर्शक फलक किंवा रिफ्लेक्टर लावले नव्हते. यादरम्यान मिहीर भास्कर मेश्राम (वय २२) हा दुचाकीस्वार तरुण अंधारातील ट्रकला धडकला. त्यात तो जखमी झाला. त्याला सावरकर नगरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे काका रामभाऊ मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिहीर हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील होता व मागील तीन वर्षांपासून नागपुरात राहत होता. आयटी पार्कजवळ तो भाड्याच्या घरात पार्टनरसोबत राहत होता. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो रूम पार्टनरला सांगून बाहेर गेला होता. अपघातानंतर त्याच्या रूम पार्टनरलाच फोन आला. मिहीर हिंगण्याकडून सुभाषनगरकडे येत असताना हा अपघात झाला. त्याची बहीण मेडिकल ऑफिसर असून, त्याच्या मृत्यूने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
रुग्णालयाचा भरती करून घेण्यास नकार
अपघाताची माहिती मिळाल्यावर मिहीरच्या रूम पार्टनरसह त्याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडी चक्काचूर झाली होती व मिहीरच्या शरीरातून खूप रक्त गेले होते. त्याला लगेच स्वावलंबीनगरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाने त्याला भरती करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला सावरकर नगरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
ई-रिक्षाच्या वेगाने अल्पवयीनाचा मृत्यू
दुसरा अपघात सोमवारी सायंकाळी झाला. शेख माबिन मो. सिराज हा मूळचा जालदा, पश्चिम बंगाल येथील अल्पवयीन काही दिवसांपासून त्याच्या नातेवाइकांकडे मोठा ताजबाग येथे राहत होता. सोमवारी मॉडेल मिल चौकातून दुचाकीने मोठा ताजबागकडे तो निघाला असता अशोक चौकाजवळ त्याला अज्ञात ई-रिक्षा चालकाने धडक दिली. ई-रिक्षा वेगात असल्याने त्या धडकेत सिराज रस्ता दुभाजकावर पडला व त्याच्या डोक्याला जोरात मार लागला. गंभीर जखमी झालेल्या सिराजला मेडिकलमध्ये नेण्यात आले. परंतु, तो उपचारांना प्रतिसाद देऊ शकला नाही व मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शेख मेहबुब आलम ऊर्फ शेख अशरफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात ई-रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू आहे.