संपूर्ण कुटुंबीय झाले १९७१ च्या लढाईत सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:35 PM2018-11-17T21:35:28+5:302018-11-17T21:38:21+5:30
ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.
३ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाक सीमेवर लोंगोवाल ‘पोस्ट’वर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. पाकिस्तानी सैन्याचा मोठा काफिला होता व लोंगोवाल ‘पोस्ट’वर केवळ १२५ भारतीय जवान होते. मात्र त्यांच्या नेतृत्वात सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याचा सामना केला. पाकिस्तानचे ६० ‘टँक’ नष्ट करण्यात भारतीय सैन्यदल व वायुदलाला यश आले होते. कुलदीप सिंह यांनी चाणाक्षपणे सैन्याची व्यूहरचना केली होती. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र तसेच सहा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९७१ च्या युद्धात त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी होते. त्यांचे दोन काका ‘एअरफोर्स’मध्ये ‘फायटर पायलट’ होते व त्या दोघांनाही शौर्यचक्र मिळाले होते. त्यांचे आजोबा सरदार बहादूर सिंत सिंह हेदेखील सैन्यात होते. त्यांच्या मेहुण्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनीच आपल्या मुलाखतीत दिली होती. कुलदीप सिंह चांदपुरी व त्यांच्या बटालियनच्या शौर्यगाथेवर ‘बॉर्डर’ हा चित्रपटदेखील तयार झाला होता. कुलदीप सिंह चांदपुरी हे अखेरपर्यंत फौजी म्हणूनच जगले व आपल्या कार्यातून त्यांनी तरुण पिढ्यांना मौलिक प्रेरणा दिली.