दुर्गाचा 'दुर्गावतार'; छेड काढणाऱ्याची भर रस्त्यात धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 08:39 PM2019-07-18T20:39:09+5:302019-07-18T21:30:04+5:30
मैत्रीसाठी वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्या चिडीमारास महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दुर्गावतार दाखविला. छेड काढणाऱ्या युवकाची नागरिकांच्या मदतीने बेदम धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
नागपूर (कळमेश्वर): मैत्रीसाठी वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्या चिडीमारास महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दुर्गावतार दाखविला. छेड काढणाऱ्या युवकाची नागरिकांच्या मदतीने बेदम धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बसस्थानकावर गुरुवारी घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. विद्यार्थिनीच्या या धाडसाचे नेटकऱ्यांनी कौतुक करीत तिच्या दुर्गावताराला सलाम केला !
संदीप निंबूरकर (२५) रा.गोधनी, नागपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही धाडसी विद्यार्थिनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील राहणारी आहे. ती नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै रोजी कळमेश्वर बसस्थानकावर या युवकाने संबंधित मुलीला मैत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी तिने त्यास नकार दिला होता. गुरुवारी ही मुलगी नेहमीप्रमाणे नागपूर येथे महाविद्यालयात जाण्याकरिता कळमेश्वर बसस्थानकावर उभी होती. त्यावेळी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान संदीपने तिला पुन्हा गाठले. त्याने पुन्हा एकदा या मुलीला मैत्री करण्याचा आग्रह केला. यावर तिने मी आपल्याला ओळखत नसल्याने मैत्री करणार नसल्याचे सांगितले. यावर त्याने भडकत मुलीला अश्लील शिवीगाळ केली. यावर तिने या युवकाला धडा शिकविण्याचा निर्धार करीत दुर्गावतार धारण केला. बसस्थानकावर असलेले सुजाण नागरिक विद्यार्थिनीच्या मदतीला धावले व युवकाची बेदम धुलाई केली. यानंतर त्याला कळमेश्वर येथील पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. नागरिकांनी पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावर पोलिसांनी आरोपी संदीप विरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (ड), २९४ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सुशील धोपटे करीत आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बसस्थानकावरील काही नागरिकांनी या घटनेचे व्हिडीओ शुटिंग केले. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल होताच झालेल्या प्रकाराची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे. अशा युवकांना याच पद्धतीने धडा शिकविणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.