सेवानिवृत्तीनंतरही पदाचा मोह सुटेना : कक्षापुढील नावाची पाटीही काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:38 AM2020-08-06T00:38:53+5:302020-08-06T00:41:20+5:30
जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पण ते अजूनही आपल्याच पदावर कायम आहेत आणि शासनाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहेत. पण त्यांच्या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक् झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पण ते अजूनही आपल्याच पदावर कायम आहेत आणि शासनाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहेत. पण त्यांच्या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक् झाले आहेत.
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी नुकतीच पशुसंवर्धन विभागाची एक बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत डॉ. ठाकरे हे आठ दिवसात पुन्हा आपल्या पदावर कायम राहतील, अशी घोषणा केली होती. मंत्र्यांच्या या घोषणेमुळे ते स्वत:ला अजूनही पशुसंवर्धन अधिकारीच समजताहेत. मुळात ३१ जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले. नियमानुसार त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविणे गरजेचे होते. पुनर्नियुक्तीचे पत्र येण्याची वाट बघायला हवी होती. मात्र शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करून विभागाची जबाबदारी पार पाडत आहेत.
पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही कायम असल्याबद्दल सर्वच विभाग प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. पण कुणीही त्यांना हा प्रकार नियमबाह्य असल्याचे सांगायला तयार नाही अथवा त्यांच्यावर कारवाई करायलाही तयार नाहीत. स्थायी समितीच्या बैठकीत एका सदस्याने हा विषय अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या लक्षातही आणून दिला. पण कुणीही अॅक्शन घेतली नाही. मंत्र्यांनीच घोषणा केल्यामुळे अधिकारीही कारवाईचा बडगा उभारण्यास धजावत आहेत. पण प्रशासनात एवढी वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर, प्रशासनाचे नियम अधिकाऱ्यांनीच अंगीकृत करून, सेवानिवृत्तीनंतर तरी पदाचा मोह धरून ठेवणे योग्य नाही.