लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे वैद्यकीय सोयी उघड्या पडल्या. विशेषत: अपुऱ्या खाटांमुळे काही रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचे जीव गेले. यामुळे तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन प्रशासन वैद्यकीय सोयी उभारण्यावर भर देत आहे. परंतु जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाकडे अद्यापही लक्ष नाही. सहा वर्षे होऊनही १०० खाटांच्या या रुग्णालयाचे बांधकाम अपूर्णच आहे.
आरोग्य विभागाचे जिल्हा रुग्णालय नसलेला नागपूर एकमेव जिल्हा आहे. धक्कादायक म्हणजे, २०१२ पर्यंत या रुग्णालयाचा विषयच समोर आला नाही. १७ जानेवारी २०१३ रोजी नागपुरात १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यावर निर्णय झाला. रुग्णालयाच्या बांधकामाकरिता प्रादेशिक मनोरुग्णालयाची ८.९० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु रुग्णालय व वेअर हाऊसच्या बांधकामासाठी २८ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी तीन वर्षे लागली. ८ डिसेंबर २०१७ रोजी यातील १६ कोटीला तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली. प्रत्यक्ष बांधकामाला ऑक्टोबर २०१८ पासून सुरुवात झाली. हे बांधकाम मे २०१८ च्या मुदतीत पूर्ण होणार होते. परंतु शासनाने वेळेवर निधीच दिला नाही. २०१९-२० आर्थिक वर्षात केवळ १ कोटी ८० लाखच दिले. यामुळे दरम्यानच्या काळात बांधकाम रखडले. चालू आर्थिक वर्षात ६ कोटींची तरतूद केली आहे. परंतु अद्यापही निधी मिळाला नाही. रुग्णालयाचे जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. निधी मिळाल्यास उर्वरित काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
असे असणार होते रुग्णालय
जिल्हा रुग्णालयाच्या दोन मजली इमारतीत तळमजल्यावर ‘ओपीडी’ नेत्ररोगाचा वॉर्ड, ईसीजी कक्ष, प्रयोगशाळा, वैद्यकीय भांडार, फिजिओथेरपी कक्ष, रक्तपेढी, एक्स-रे कक्ष, पाकगृह राहणार आहे. पहिल्या माळ्यावर स्त्री रोग व प्रसुती वॉर्ड, बालरोग वॉर्ड, लेबर रुम, बालचिकित्सा ओपीडी, सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, प्रतिक्षालय, डॉक्टर्स रुम, नर्सिंग स्टेशन, स्त्री सर्जिकल वॉर्ड, रेकॉर्ड रुम, अतिदक्षता विभाग, ‘डेंटल ओपीडी’ राहणार आहे. दुसऱ्या माळ्यावर कार्यालय व सभागृह राहणार आहे.
डिसेंबर २०२१ पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता
मे २०१८ पर्यंत जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणार होते. परंतु वेळेवर निधी न मिळाल्याने बांधकामाला मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत बांधकामावर जवळपास १६ कोटी ५० लाख रुपये खर्च झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयाचे व सिव्हील सर्जन कार्यालयाचे बांधकाम पूर्णत्वाच्या दिशेने आहे.
-सुरेश पाध्ये, शाखा अभियंता, बांधकाम विभाग