लसीकरणानंतरही पॉझिटिव्ह येणाऱ्यांमधील विषाणूची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 09:54 AM2021-05-04T09:54:05+5:302021-05-04T09:55:20+5:30
Coronavirus in Nagpur लसीकरणानंतरही काही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. यातील काहींचा सिटी स्कॅनचा स्कोर २५ पर्यंत जात आहे. अशा रुग्णांमधील विषाणूचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करण्यासाठी नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) प्रयोगशाळेकडून लवकरच दिल्ली येथील आयसीएमआरकडे नमुने पाठविले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लसीकरणानंतरही काही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. यातील काहींचा सिटी स्कॅनचा स्कोर २५ पर्यंत जात आहे. अशा रुग्णांमधील विषाणूचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करण्यासाठी नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) प्रयोगशाळेकडून लवकरच दिल्ली येथील आयसीएमआरकडे नमुने पाठविले जाणार आहे.
कोरोना संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. त्यापूर्वी वाढत्या रुग्णांमागील विषाणूचा नवा स्ट्रेनची माहिती घेण्यासाठी मेयोच्या प्रयोगशाळेने डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ मध्ये कोरोनाच्या ७५ गंभीर रुग्णांचे नमुने दिल्ली व पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविले होते. २४ मार्च २०२१ रोजी शासनाने महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे नवे दोन स्ट्रेन आढळून आल्याचे जाहीर केले. मात्र शहराची नावे गुपित ठेवण्यात आली होती. मेयोने पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल ७ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त झाला. यात कोरोना विषाणूचा नवीन पाच ‘स्टेन’ची ओळख पटल्याची माहिती पुढे आली. यातील तीन नमुन्यात ‘ई४८४के’, ‘ई४८४क्यू’ स्टेन मिळाले तर दोन नमुन्यात ‘एन४४०के’ स्टेन सापडला. २६ नमुन्यांमध्ये ‘एल४५२आर:ई४८४के स्टेन आढळले. सात नमुन्यांमध्ये ‘एल४५२आर’ स्टेन आढळून आले. उर्वरित ३५ नमुन्यांमध्ये जुने स्टेन असल्याची माहिती पुढे आली. तज्ज्ञाच्या मते, या स्टेनमध्ये सर्दी, खोकला हगवण सारखी लक्षणे दिसतात. नव्याने आढळून येणाऱ्या पाचही स्टेनची लागण क्षमता खूप जास्त असलीतरी त्याची गंभीरता कमी आहे.
मेयोच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र खडसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, विषाणूचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करण्यासाठी शासनाच्या नव्या निर्देशानुसार, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली व त्यानंतरही कोरोनाची लागण झालेल्या व सिटी स्कोर २५ पर्यंत गेलेल्यांचे नमुने घेतले जात आहे. परंतु अशा रुग्णांची संख्या फार कमी आहे. आतापर्यंत पाच रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.