नागपूर : हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्यानंतर तत्काळ उपाययोजना केल्यास मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात कमी करण्यासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ‘३५व्या ट्रॅफिक पोलीस’ दिनानिमित्त वाहतूक पोलिसांना ‘बेसिक लाइफ सपोर्ट’चे (सीपीआर) प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाने रस्त्यावर हृद्य विकाराचा झटका आलेल्यांना वाहतूक पोलिसही वाचविण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहे.
दत्ता मेघे मेडिकल कॉलेज, वानाडोंगरीशी संलग्न असलेल्या या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पोलिस मुख्यालय, काटोल रोड येथे 'बेसिक लाइफ सपोर्ट' कार्यशाळेचे आयोजन केले होते. य्उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंघल यांच्या हस्ते झाले. डॉ. सिंघल म्हणाले, वाहतूक पोलीस अपघाताला रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावतात, आता आपत्कालीन परिस्थितीत ‘सीपीआर’ देऊन महत्त्वाची भूमिकाही बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. अदीबा सिद्दिकी यांनी ब्रदर विकी यांनी हे प्रशिक्षण दिले. हृदयविकाराचा झटका, शॉक, रक्तस्त्राव आणि श्वास गुदमरणे यासारखे आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती देत प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला सहायक वाहतूक आयुक्त जयेश भांडारकर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. अनुप मरार, सीएमओ डॉ. संदीप शिंदे, डॉ. नरेश गिल उपस्थित होते. कार्यशाळेत २००वर वाहतूक पोलीस सहभागी झाले होते.
हृदयविकाराचा झटक्यानंतरची चार मिनीटे महत्त्वाची
अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यास हृद्य बंद पडून मेंदूला प्राणवायूचा पुरवठा बंद होतो. यामुळे झटका आल्यानंतरची चार-पाच मिनीटे महत्त्वाची असतात. या वेळेत मेेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला नाही तर मेंदूचे कार्य पूर्ण बंद होते आणि मेंदू मृत अवस्थेत जातो. म्हणूनच मेंदूचा मृत्यू होऊ नये यासाठी कोणतीही उपकरणे किंवा साधने हाती नसताना पोलिसांनी काय-काय करावे, याची माहिती या ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चा कार्यक्रमातून देण्यात आली. यावेळी ‘मॅनीकीन’वर(कृत्रिम पुतळा) प्रात्याक्षिक करून पोलिसांकडून ते करूनही घेतले.