राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबर महिन्यात नागपुरात कोविड संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले. या महिन्यात तपासणी करणाऱ्यांपैकी प्रत्येकी चौथी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. परंतु दिलासादायक बाब म्हणजे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात संक्रमणाचा वेग थोडा कमी झाला. परिणामी अखेरच्या दिवशी बरे होण्याचे प्रमाण ८०.०७ टक्के पर्यंत वाढले. असे असले तरी आधीच्या साडेपाच महिन्यात जितके मृत्यू झाले त्याच्या दीडपट मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. हे चिंताजनक आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पॉझिटिव्ह रुग्ण व तपासणी करण्यात आलेले नमुने याची तुलना करता २४.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह होते. सप्टेंबर महिन्यात ४६,४५७ पॉझिटिव्ह आढळले तर १४६६ जणांचा मृत्यू झाला.मार्च महिन्यात एकूण ६६६ नमुने तपासले. यात १६ पॉझिटिव्ह आले. २.४०टक्के नमुने पॉझिटिव्ह होते. एप्रिलमध्ये २२७२ पैकी १२३ (५.४१ टक्के), मे मध्ये ९१७१ नमुन्यांपैकी ३९२ (४.२७ टक्के), जूनमध्ये १२२९१ पैकी ९७२ (७.८४ टक्के), जुलैत ५५१०० पैकी ३८८९ (७.०५ टक्के) ऑगस्ट महिन्यात १७५३१७ पैकी २४१६३ (१३.७८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात कोविड संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.सप्टेंबर महिन्यात बरे होण्याचे प्रमाण चांगले राहिले. या महिन्यात ४३,२२३ संक्रमित दुरूस्त झाले. त्यामुळे ऑगस्टपर्यंत बरे होण्याचे प्रमाण ६५.११ टक्के होते. ते ३० सप्टेंबरला ८०.०७ टक्के पर्यंत पोहचले. ३१ ऑगस्टपर्यंत १९,२४४ संक्रमित कोरोनामुक्त झाले. हा आकडा वाढून ३०सप्टेंबरला ६२,४६७ इतका झाला. शहरात कोरोवर मात करणाऱ्यांची संख्या ५०,२६३ इतकी असून ग्रामीण भागात १२,२०४ आहे. शहरात सक्रिय रुग्ण ९,६०७ असून ग्रामीणमध्ये ३,४२८ आहेत.