सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीच्या दोन दिवसाआधी शहरातील उंटखाना वस्तीतील महानगरपालिकेच्या शाळेत ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची धर्मांतराच्या विषयावर सभा झाली. या सभेत दादासाहेब गायकवाड यांनी धर्मांतराचा कार्यक्रम सार्वत्रिक निवडणुकानंतर करावा यावर जोर दिला. परंतु सभेत उपस्थित अॅड. हरिदास बाबू आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर कार्यक्रमाला जाहीर पाठिंबा दर्शविला. 'धर्मांतराची व्यवस्था नीट ठेवा' या आशयाचे बाबासाहेबांनी १५ दिवसांपूर्वी लिहिलेले पत्र खिशातून काढून दाखविताच सर्वच अवाक झाले. धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पाडणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. निवडणुका येतील आणि जातील पुढे पाहू, धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणारच, असे ठासून सांगत, कार्यकर्त्यांचे मन वळविले.कर्मवीर बाबू हरिदास आवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते. १ जुलै १९१६ रोजी कामठी छावणी येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण रायपूर व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झालेले बाबू हरिदास आवळे यांनी विज्ञान व कायद्याची पदवी घेतली. विद्यार्थिदशेपासूनच ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. येथूनच ते बाबासाहेबांच्या जवळ पोहचले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून अनुशासनप्रिय कार्यकर्ता म्हणून ते लोकप्रिय होते. डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मध्यप्रदेश शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे ते सरचिटणीस होते. मध्य प्रदेशातील हजारो अस्पृश्यांनी धम्मदीक्षेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी पत्रक काढून आवाहन केले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतराच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिवार्णानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर १३ एप्रिल, १९५७ रोजी रातोरात कमळाच्या फुलात उभी असलेली तथागत गौतम बुद्ध यांच्या मूतीर्ची स्थापना केली. ती मूर्ती कुणी बसविली, अशी चौकशी पोलिसांनी केल्यानंतर कुणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. तेव्हा स्वत: आवळेबाबूंनी पुढे येत जबाबदारी स्वीकारली व स्वत:वर अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करून घेतला.दीक्षाभूमीची १४ एकर जागा मिळवून दिलीआवळे बाबू महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. विधान परिषदेत अशासकीय ठराव आणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बौद्धांच्या धार्मिक कायार्साठी चौदा एकर जागा मिळवून दिली. दीक्षाभूमी मिळविण्याचे श्रेयही आवळे बाबू यांनाच जाते. बाबासाहेबांच्या पश्चात संघटनांचा भार वहन करण्यासाटी गठित करण्यात आलेल्या प्रेसिडियमचे ते सेक्रेटरी होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे ते उपाध्यक्ष होते. त्यांना ऑल इंडिया समता सैनिक दलाचे अध्यक्ष म्हणूनही निवडण्यात आले.