ईव्हीएम सुरक्षितच, सीसीटीव्हीचा २४ तास वॉच : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:51 PM2019-03-28T22:51:17+5:302019-03-28T22:53:03+5:30
ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. २४ तास सीसीटीव्हीचा वॉच आहे. पोलिसांसाठी लॉगबुक आहे. त्यात प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली जाते. कुणीही त्या ठिकाणी भटकू शकत नाही. ईव्हीएम ठेवलेले सेंटर हे जिल्हा सर्व पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच उघडण्यात येते. ईव्हीएम ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाने प्रोटोकॉल घालून दिले आहेत, त्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जात आहे, असे असताना ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत कुणी शंका घेत असतील तर ते अजिबात चुकीचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी पत्ररपरिषदेत स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. २४ तास सीसीटीव्हीचा वॉच आहे. पोलिसांसाठी लॉगबुक आहे. त्यात प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली जाते. कुणीही त्या ठिकाणी भटकू शकत नाही. ईव्हीएम ठेवलेले सेंटर हे जिल्हा सर्व पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच उघडण्यात येते. ईव्हीएम ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाने प्रोटोकॉल घालून दिले आहेत, त्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जात आहे, असे असताना ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत कुणी शंका घेत असतील तर ते अजिबात चुकीचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी पत्ररपरिषदेत स्पष्ट केले.
दरम्यान नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी पत्रपरिषद घेऊन ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित करीत काही आरोप केले होते. यावेळी त्यांनी काही व्हीडिओ सुद्धा दाखवले होते. पटोले यांची तक्रार व आरोपांबाबत पत्रकारांनी जिल्हाधिकारी मुदगल यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट करीत पटोले यांच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या शंकांचे निराकरण त्यांनी केले.
ईव्हीएमबाबत अधिक माहिती देतांना मुदगल यांनी सांगितले की, ईव्हीएम आणि ती ठेवण्याच्या जागेसंदर्भात निवडणूक आयोगाचा प्रोटोकॉल आहे. त्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हा सुद्धा ईव्हीएमच्या सुरक्षेसंदर्भातील प्रोटोकॉलचाच एक भाग आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे. सर्व सीसीटीव्ही सुरु आहेत. त्यांची रेकॉर्डिंग सेव्ह केली जात आहे. ती करावीच लागते.
आतापर्यंत सर्वच ईव्हीएम मशीन शिफ्ट झालेल्या नाहीत. केवळ ‘सीय’ शिफ्ट केले आहे. नंतर ‘डीयू’शिफ्ट केले जातील. ईव्हीएम मशीनची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक झालेल्या प्रत्येक ईव्हीएमची इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे आहे.
तसेच ईव्हीएमचे सेंटर हे कधीही केव्हाही उघडता येत नाही. ते उघडायचे असेल तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अगोदर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवावे लागते. त्यांच्या उपस्थितीतच ईव्हीएमचे सेंटर उघडले जाते. हा सुद्धा ईव्हीएम सुरक्षेतील प्रोटोकॉलचाच भाग आहे. तेव्हा ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत कुठलीही शंका घेण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांची लेखी तक्रार मिळाली आहे. त्यांचा आक्षेप विशेषत: दक्षिण व मध्य मधील सेंटरबाबत आहे. त्याची शहानिशा करण्यात आलेली आहे. कुठलेही सीसीटीव्ही बंद नाहीत. त्याची संपूर्ण रेकॉर्डिंग आमच्याकडे सेव्ह आहे. त्यांनी घेतलेल्या शंकांबाबतचे सर्व पुरावे सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे आदी उपस्थित होते.
डिस्प्ले बंद म्हणजे सीसीटीव्ही बंद नव्हे
टीव्हीवर डिस्प्ले बंद असणे म्हणजे सीसीटीव्ही बंद आहे, असा होत नाही. काही तांत्रिक कारणामुळे टीव्हीवर डिस्प्ले बंद होऊ शकतो. या प्रकरणातही काहीसा असाच प्रकार झालेला आहे. मात्र सीसीटीव्ही पूर्णपणे सुरू आहेत. २४ तास सुरू आहेत. त्या तारखेचे संपूर्ण रेकॉर्डिंग विभागाकडे आहे. ते कधीच बंद होत नाही. लाईट गेले असेल तरी बॅकअपची सुविधा आहे, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
व्हिडिओ अवैध असल्यास तपासून कारवाई करू
ईव्हीएम ठेवण्यात आलेला परिसरात कुणालाच जाता येत नाही. बाहेर पोलिसांचा पहारा आहे. त्यांना आत ठेवलेल्या ईव्हीएमवर नजर ठेवता यावी म्हणून बाहेरच टीव्ही डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचाच व्हीडिओ तयार करण्यात आला असावा. परंतु अवैधपणे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला का, याची तपासणी केली जाईल. तसे आढळल्यास कारवाई होईल, असेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्पष्ट केले.
असे आहेत पटोलेंचे आरोप
- पंचायत भवन व बचत भवन येथे ‘ईव्हीएम’कडे गंभीरतेने लक्ष नाही.
- ‘स्ट्रॉंग रुम’मधील ‘सीसीटीव्ही’ बंद, ‘एलईडी स्क्रीन’वर ‘आऊटपुट’ नाही
- ज्या वाहनातून ‘ईव्हीएम’ आणल्या त्यावर विशिष्ट रंगाचाच जाणूनबुजून कपडा.