नागपूर : २०२०-२१ मध्ये तंत्रशिक्षणांतर्गतच्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), नॉन क्रिमिलेयर व जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन अर्ज भरताना अनेक उमेदवारांकडे ही प्रमाणपत्रे नव्हती. त्यांनी केवळ ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अर्ज केला असल्याची पावती सादर केली होती. ही मुदतवाढ केवळ अशाच उमेदवारांना देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जारी केलेल्या पत्रानुसार, संबंधित उमेदवारांना स्वत:च्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीने २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत प्रमाणपत्रे सादर करण्यात अपयशी ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करून त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळण्यास पात्र ठरवण्यात येईल. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.