लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न वाढवावे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच वाढ होणार आहे. देशात पशुधन वाढल्यास शेतकरी आणि युवकांच्या रोजगारात वाढ होईल. पशुधनाने शेतकऱ्यांना ३६५ दिवस निश्चितच काम मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुधन दुग्ध विकास आणि मत्सपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे केले.अॅग्रोव्हिजनतर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘विदर्भातील दुग्धोत्पादन आणि प्रक्रिया’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मिश्रा, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत वासनिक, मीरत येथील पशुसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन.व्ही. पाटील, पशुसंशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. पी.के. घोष, इंडियन डेअरी असोसिएशनचे चेअरमन डॉ. आर.डी. कोकणे, डॉ. सत्येंदर सिंग आर्य, लक्ष्मीनारायण मिश्रा, सत्राचे समन्वयक डॉ. सी.डी. मायी आणि रवी बोरटकर उपस्थित होते.अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकरी आणि नवयुवकांना माहिती देण्याचे नितीन गडकरी यांचे कार्य सर्वोत्तम असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकाचे पॅटर्न बदलवावे. सोबतच पशुधनाचा अवलंब करावा. देशात १.७० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. ते दरवर्षी वाढत आहे. डेअरीमध्ये २२ टक्के वाटा आहे. कृषी आधारित पशुधन असते तर देशाचा विकास वेगात झाला असता. देशात पशुधनाची निर्यात ७५ ते ८० हजार कोटींची आहे. ती टेक्सटाईल उद्योगापेक्षा दुप्पट आहे. कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगात कोट्यवधींची गुंतवणूक होणार असल्याचे सीआयआरने म्हटले आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे.दुधासोबत चाऱ्याचे उत्पादन वाढवावे लागेल. शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी बनविण्यास उत्सुक नाही, ही देशाची शोकांतिका आहे. शेतीचे गुंतवणूक मूल्य कमी झाल्यास लोक शेतीकडे वळतील, असे मत गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले.दिलीप रथ म्हणाले, विदर्भात दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात अॅग्रोव्हिजनमुळे मोठे परिवर्तन आले आहे. पुढील दोन वर्षात दररोज ३.५ लाख लिटर दूध संकलनाचे मदर डेअरीचे लक्ष्य आहे.प्रास्तविक डॉ. सी.डी. मायी यांनी तर आभार रवी बोरटकर यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पशुधनानेच होणार शेतकऱ्यांचा विकास : गिरीराज सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 8:52 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न ...
ठळक मुद्देअॅग्रो व्हिजनमध्ये डेअरी विकासावर कार्यशाळा