नागपूर जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकरी कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:48 PM2020-04-03T23:48:35+5:302020-04-03T23:50:19+5:30
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार ४१३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २७२ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार ४१३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २७२ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे जाहीर केले. दोन लाख रुपयांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच लाभ देण्याचे आदेश काढले. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचे कर्जदार व ३० सप्टेंबर २०१९ मुद्दल व व्याज मिळून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांसोबत शेतकरी संघटनाकडूनही टीका करण्यात आली. सरकारने दोन लाखांवरील शेतकऱ्यांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे जाहीर केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज मागविण्यात आले नाही. बँकांकडूनच यादी घेण्यात आली.
सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ४० हजार ९० शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ३४ हजार ७९० शेतकऱ्यांच्या आधार नंबरचे प्रमाणीकरण पूर्ण झाले. आतापर्यंत ३१ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या खात्यात २७२ कोटी ४६ लाखांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले जाते.