शेतकऱ्यांचे कापसाचे कोट्यवधीचे चुकारे पचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:14 PM2019-05-27T23:14:45+5:302019-05-27T23:19:30+5:30
काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.
काटोल परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मे. साई युथ अॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीला कापूस विकला. कंपनीने सर्व शेतकऱ्यांना धनादेश दिले. परंतु शेतकऱ्यांचे धनादेश वटलेच नाही. दुसऱ्यांदा पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. तेसुद्धा वटले नाही. त्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलावून एकूण रकमेच्या ५० व २५ टक्के रकमेचे चेक दिले. त्याचीही रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. जवळपास १०१ शेतकऱ्यांचे १ कोटी ९४ लाख रुपयांचे चुकारे अडकून असल्याचा आरोप समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समितीचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारीला बैठक घेऊन संचालकाला बोलाविले. संचालकाने ३१ जानेवारीपर्यंत चुकारे देण्याचे मान्य केले. परंतु दिलेली तारीखही त्यांनी पाळली नाही. शेवटी शेतकऱ्यांनी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर, वर्षा लाखेकर, राहुल साठोने, राजेश साठोने यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला. अखेर पोलिसांनी राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु वर्षा लाखेकर व रमेश साठोने यांच्यावर कारवाई केली नाही. या दोन्ही संचालकांना अटक करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांच्या समितीने केली आहे. तसेच संचालकांची संपत्ती विकण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. पत्रपरिषदेला गजानन बोंद्रे, बालाजी ढाले, अनिल लाड, रामेश्वर पाटील, नेकचंद चोरघडे, ज्ञानेश्वर धुंदे, कृष्णराव बावीस्कर, नंदकिशोर मुरोडिया, हेमकांत चिवडे, अखिलेश चपट, चंद्रशेखर गाखरे, नितीन नखाते, सुखदेव वाघे आदी उपस्थित होते.