नागपूर : कुणाचीही सेवा किंवा सेवाकार्य करताना त्यात आपलेपणाची भावना असणे आवश्यक असते. सेवेतूनच जिव्हाळा व आपुलकी वाढते. त्यामुळे सेवा करताना त्यातून काही मिळेल, असा विचारही मनात यायला नको. फॅशन व प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शुक्रवारी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला समाजसेवक डॉ. विकास आमटे, तेलंगणा येथील उद्योजक कोठा जयपाल रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. वा. द. भाके, सचिव डॉ. दीपक कडू प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्य व जानवरांमध्ये मोठा फरक असतो. तरीदेखील पशू एकत्रित असतानादेखील आजारी असलेल्याची काळजी करतात. अनेक लोक सेवाकार्य करताना कार्यक्रमांना प्रसिद्ध लोकांना बोलवितात. त्यापेक्षा त्या कार्याशी संबंधित व त्याला पुढे नेणाऱ्या लोकांना बोलविले पाहिजे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तर सामाजिक कार्यात विशेष पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. डॉ. भाके यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. दीपक कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पोलीस, वकील, डॉक्टर वाढणे हे समाजाच्या अनारोग्याचे लक्षण यावेळी डॉ. विकास आमटे यांनी परखड शब्दांत आपले मत मांडले. समाजात पोलीस, वकील, डॉक्टर यांची संख्या वाढणे हे समाजाच्या अनारोग्याचे निदर्शक आहे. न्यायालयांची, कारागृहांची संख्या वाढणे हे भूषणावह नाहीच. आम्ही आनंदवनात कार्य करतो, मात्र हे आनंदवन बंद करणे हेच आमचे मिशन आहे. तेथील कुष्ठरोग पाहता आनंदवनाचे कार्य वाढणे हे भूषणावह राहूच शकत नाही. देशातील सव्वा कोटी कुष्ठरोग्यांकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे. मात्र देशातील ११९ कायदे कुष्ठरोग्यांच्या विरोधातील आहे. त्यावर काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बाबा आमटेंनी घेतले होते पिस्तूल
यावेळी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी बाबा आमटेंबाबत एक माहिती दिली. त्यांना संघाचे तत्कालीन प्रचारक यादवराव जोशी यांनी ही माहिती दिली होती. इंग्रजांशी संघर्ष सुरू असताना बाबा आमटे यांनी पिस्तूल घेतले होते. ही बाब तत्कालीन सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना कळली, तेव्हा त्यांनी आमटे यांच्याशी संवाद साधला. आमटे तुमची भावना चांगली आहे, मात्र याच्या परिणामांचादेखील विचार करा, असे ते म्हणाले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.