मोबाईलबद्दल विचारणा करणाऱ्या पित्याचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:38 PM2021-08-17T12:38:57+5:302021-08-17T12:39:22+5:30
महिनाभरापूर्वी घेऊन दिलेल्या मोबाईलबद्दल विचारणा केली म्हणून एका तरुणाने त्याच्या वडिलांचे डोके फोडले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिनाभरापूर्वी घेऊन दिलेल्या मोबाईलबद्दल विचारणा केली म्हणून एका तरुणाने त्याच्या वडिलांचे डोके फोडले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
लीलाधर वासनिक असे जखमी पित्याचे नाव आहे. ते मोलमजुरी करतात. त्यांचा मुलगा आरोपी शैलेश (वय २२)याला त्यांनी पदरमोड करून जमविलेल्या पैशातून १४ हजारांचा मोबाईल विकत घेऊन दिला होता. आरोपी शैलेश रविवारी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. त्याच्याकडे मोबाईल दिसत नसल्याने लीलाधर यांनी त्याला ‘मोबाईल कुठे आहे’ अशी विचारणा केली. त्यावरून आरोपी शैलेशने वडिलांशी वाद घालून त्यांच्या डोक्यावर काठीने वार केला. डोके फुटल्याने लीलाधर रक्तबंबाळ झाले. घरचे आणि आजूबाजूचे धावल्याने लीलाधर बचावले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने यापूर्वीही अनेकदा वडिलांना मारहाण केल्याचे सांगितले जाते.
----