लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २२ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये, औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमिफ्लूच्या’ गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. नुकतेच व्हेंटिलेटर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा ‘प्रोटोकॉल’ करण्याबाबत चर्चा झाली. यात राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल झाल्याचे सामोर आले आहे. स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ‘डेथ आॅडिट’ अहवालात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारणही आढळून येत आहे. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. सोबतच हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून या विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाक, तोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.स्क्रब टायफसने घेतला महिलेचा बळीस्वाईन फ्लसोबतच स्क्रब टायफसच्याही रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूरच्या एकट्या मेडिकलमध्ये या आजाराच्या १४५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २२ रुग्णांचे बळी गेले आहेत. बुधवारी यवतमाळ येथील पूजा सावंत (४५) या महिलेचा मेडिकलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला.
नागपूर विभागात दुर्लक्षचनागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या सहा जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस, डेंग्यू व आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. परंतु या आजाराची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, जिल्हा हिवताप अधिकारी दीर्घ रजेवर गेल्या आहेत. यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. बळीची संख्या वाढल्यावरच याला गंभीरतेने घेणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.