लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ॲक्टिव्हाने जात असलेल्या तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शाेध घेतला जात आहे. दरम्यान, बुधवारी प्रणय ठाकरे याच्या अंत्यसंस्कारादरम्यान ज्ञानेश्वरनगरात शोकाकुल वातावरण होते.
मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता इमामवाड्यातील जाटतरोडी चौकीसमोर नायलॉन मांजामुळे २० वर्षीय प्रणयचा गळा कापला गेला. प्रणयने हेल्मेट घातले होते. त्यानंतरही मांजाने त्याचा गळा खोलवर कापला गेला. त्याला लगेच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. प्रणय हा बहिणीचे डोमिसाईल सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपल्या वडिलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. तेथून दोघेही वेगवेगळ्या गाडीने घरी परत येत होते. दरम्यान, ही घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेततले आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३०४ (अ) १८८ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या घटनेत पोलीस सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करतात. परंतु या प्रकरणात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने दिसून येते.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रणयच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. परिसरातील लोकांनाही विचारपूस केली जाणार आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेतील प्रत्यक्षदर्शींचे दोन मत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, नायलॉन मांजा एका वाहनात अडकला होता. तर काहींचे म्हणणे आहे की, दोन्ही बाजूंकडून मांजा ओढल्यामुळे ही घटना घडली. मुलाच्या मृत्यूमुळे ठाकरे कुटुंबात शोक पसरला आहे. त्यांनीसुद्धा दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.