लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मेरे लडकोंको ईशारा करूंगा तो यहां से जिंदा वापस नही जायेंगा, अशी धमकी देऊन कुख्यात गुंड रणजित सफेलकरने साथीदारांच्या मदतीने कळमन्यातील एका व्यावसायिकाची दोन दुकाने हडपली. सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांच्या मुसक्या बांधल्यामुळे दिलासा मिळाल्याने हिम्मत करून पीडित व्यावसायिकाने अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रवी राजू डिकोंडवार (वय ३२)असे तक्रार करणाऱ्याचे नाव आहे.
डिकोंडवार यांनी मुजफ्फर हुसेन नामक व्यक्तीकडून २९ मार्च २०१६ ला माैजा वांजरा परिसरात १२०० चाैरस फुटाचा भूखंड विकत घेतला. त्यावर त्यांनी चार दुकाने बांधली. त्यानंतर सफेलकरने डिकोंडवार यांना कामठीला आपल्या अड्डयावर बोलवून घेतले. तेथे त्याचे गुंड हजर होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे धाक दाखवून डिकोंडवारवर दडपण वाढवले. तुझी दोन दुकाने मला हवी आहे, असे सफेलकर म्हणाला. डिकोंडवारने आपली रोजीरोटी यावर चालते, ती दुकाने देऊ शकत नाही, असे म्हटले असता सफेलकरने त्यास ‘जिंद रहना है की नही, अच्छे से समझा रहां हूं, समझ मे नही आ रहा क्या, असे विचारत मेरे लडकोंको ईशारा करूंगा तो यहां से जिंदा वापस नही जायेंगा, असे म्हणत धमकावले.’ जीवाच्या भीतीपोटी डिकोंडवारने दोन दुकाने देण्याचे मान्य केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सफेलकर, राकेश काळे, अजय चिन्नोर, चेतन कडू आणि त्यांचे चार ते पाच साथीदार तेथे धडकले. त्यांनी दुकानांचा कब्जा घेऊन तेथे ओम साई लॅण्ड डेव्हलपर्स नावाने बोर्ड लावला. दरम्यान, ७ महिन्यांनंतर डिकोंडवारने सफेलकरचे साथीदार अजय चिन्नोर, राकेश काळे आणि संजय कारोंडे यांना दुकान खाली करून देण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी सफेलकरला भेटण्यास सांगितले तर सफेलकरने डिकोंडवार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले. दरम्यान, सफेलकरच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळून त्याची वरात काढल्यामुळे डिकोंडवार यांना हिम्मत आली. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी सफेलकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
पीडितांनी तक्रारी द्याव्या
अशाच प्रकारे सफेलकर आणि त्याच्या साथीदारांनी अनेकांच्या जमिनी, दुकाने आणि सदनिका बळकावल्या आहेत. दहशतीमुळे पीडित गप्प बसले आहेत. पीडितांनी गुन्हे शाखेत येऊन आपली तक्रार नोंदवावी, पोलीस त्यांना आवश्यक ती सर्व मदत करतील, अशी ग्वाही गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.