अखेर नागपूर रेल्वेस्थानकावर बॅटरी कारचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:13 AM2018-04-06T01:13:24+5:302018-04-06T01:13:42+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर मागील सहा महिन्यांपासून बॅटरी कारची सेवा ठप्प झाल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा त्रास होत होता. परंतु गुरुवारपासून बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर मागील सहा महिन्यांपासून बॅटरी कारची सेवा ठप्प झाल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा त्रास होत होता. परंतु गुरुवारपासून बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बॅटरी कार सेवेचा शुभारंभ गुरुवारी स्टेशन व्यवस्थापक दिनेश नागदिवे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पूर्वी बॅटरी कारची सुविधा नि:शुल्क देण्यात येत होती. परंतु आता ही सेवा घेण्यासाठी प्रवाशांना ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. पूर्वी एका सामाजिक संस्थेच्यावतीने बॅटरी कारची सेवा नि:शुल्क देण्यात येत होती. त्यासाठी एका नामवंत महाविद्यालयाने प्रायोजकत्व स्वीकारले होते. परंतु पुढे या महाविद्यालयाने प्रायोजकत्व समाप्त केल्यामुळे सामाजिक संस्थेला बॅटरी कारचा खर्च करणे शक्य झाले नाही आणि संस्थेने ही सेवा बंद केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने बॅटरी कारसाठी निविदा काढली. त्यात पटणाच्या एरकॉन कंपनीने रुची दाखविली. परंतु कंपनीने रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आलेली बॅटरी कार आकाराने मोठी असल्यामुळे त्यात रुची दाखविली नाही. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा निविदा काढली. यावेळीही इरकॉन कंपनीलाच कंत्राट मिळाले. यावेळी कंपनीने छोट्या आकाराची बॅटरी कार उपलब्ध करून दिली. परंतु सेवा सुरु होण्यासाठी रेल्वेच्या संरक्षण विभागाने वेळेवर परवानगी दिली नसल्यामुळे दोन महिने बॅटरी कार सेवा सुरु होऊ शकली नव्हती. ही परवानगी मिळाल्यानंतर आता बॅटरी कारची सेवा सुरू झाली आहे. या सुविधेनुसार प्रवाशांकडून ५० रुपये घेऊन त्यांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर सोडण्यात येईल.