अखेर रेल्वेस्थानकावरील जनआहार झाले सुरू ! ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:07 AM2021-07-17T04:07:27+5:302021-07-17T04:07:27+5:30
गरीब प्रवाशांसाठी सुविधा : प्लॅटफार्मवरही मिळणार भोजन नागपूर : मागील दोन वर्षांपासून नागपूर रेल्वेस्थानकावरील जनआहार बंद होते. त्यामुळे गरीब ...
गरीब प्रवाशांसाठी सुविधा : प्लॅटफार्मवरही मिळणार भोजन
नागपूर : मागील दोन वर्षांपासून नागपूर रेल्वेस्थानकावरील जनआहार बंद होते. त्यामुळे गरीब प्रवाशांना स्वस्त दरात भोजन मिळणे कठीण झाले होते. परंतु गुरुवारपासून जनआहार केंद्र सुरू झाल्यामुळे गरीब प्रवाशांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध होत असून प्रवाशांचा जनआहारला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर असलेले जनआहार हॉटेल पूर्वी रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात होते. परंतु त्यानंतर जनआहारचा ताबा इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲन्ड टुरीझम कार्पोरेशनने घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पूर्वीपासून म्हणजे दोन वर्षांपासून जनआहार बंद होते. नुतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे जनआहार बंद असल्याचे आयआरसीटीसीच्यावतीने सांगण्यात येत होते. जनआहार बंद असल्यामुळे गरीब प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील महागड्या हॉटेलमधून भोजन विकत घ्यावे लागत होते. रेल्वेगाडीत साधा नाश्ता विकत घेतला तरी प्रवाशांना ३० ते ३५ रुपये मोजावे लागत होते. परंतु जनआहार सुरू झाल्यामुळे गरीब प्रवाशांना आता २० रुपयात जनता खाना मिळत आहे. थाळी तसेच इतर खाद्यपदार्थही प्रवाशांना स्वस्त दरात मिळत आहेत. केवळ जनआहारच्या हॉटेलमध्येच नव्हे तर प्रवाशांना प्लॅटफार्मवरही जनआहारच्या १० कर्मचाऱ्यांकडून भोजन तसेच नाश्ता उपलब्ध होणार आहे. पहिल्याच दिवसापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद जन आहारला मिळत असून आगामी काळात हा प्रतिसाद आणखी वाढण्याची अपेक्षा जनआहारच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
.................