अन् त्या माऊलीला मिळाली सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:54+5:302021-02-23T04:11:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पोटच्या तीन मुलांसह एक वेडसर विधवा महिला काही दिवसांपासून उमरेडच्या गांगापूर चौक परिसरात सातत्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पोटच्या तीन मुलांसह एक वेडसर विधवा महिला काही दिवसांपासून उमरेडच्या गांगापूर चौक परिसरात सातत्याने फिरत होती. तिच्या एकूणच वर्तवणुकीवरून ती हतबल आणि त्रस्त असल्याची जाणीव काही तरुणांना झाली. त्या तरुणांनी या महिलेसह मुलांनाही नागपूर येथील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था केली. माऊलीला सावली देण्याचे सामाजिक दायित्त्व पार पाडणाऱ्या या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्थानिक गांगापूर परिसरात मागील काही दिवसांपासून एक ३२ वर्षीय वेडसर महिला आपल्या तीन मुलांसह भटकंती करीत होती. तिची अवस्था बघून रोशन झाडे, हर्षल आंबेकर या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. लागलीच प्रज्ञा बोरडे, अनिल वाढीवे, रामदास कोराम या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी दखल घेतली. त्यानंतर उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी महिला आणि तीन मुलांना नेण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर स्वखर्चातून चारही जणांना नागपूर येथील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सखी’ वन स्टॉप सेंटरमध्ये पोहोचविण्यात आले. सोबतच या तरुणांनी कागदोपत्री संपूर्ण प्रक्रियासुद्धा केली.