अखेर विद्यार्थ्यांना दिलासा, ‘शुल्क’सूट जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:14+5:302021-07-20T04:07:14+5:30
नागपूर विद्यापीठ : परीक्षा शुल्कासह ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना शुल्कातदेखील सूट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर ...
नागपूर विद्यापीठ : परीक्षा शुल्कासह ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना शुल्कातदेखील सूट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर विद्यार्थ्यांना विविध शुल्कांत सूट देण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. यानुसार हिवाळी २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या शुल्कात ७५ टक्के सूट देण्यात आली आहे. तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांच्या ग्रंथालय, प्रयोगशाळा शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली आहे, तर ९ विविध शुल्कांमध्ये १०० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विद्यापीठातील परीक्षा शुल्क तसेच महाविद्यालयांतील विविध शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी विविध प्राधिकरण सदस्यांनी लावून धरली होती. त्यावर व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली होती व शुल्कमाफीचे नेमके सूत्र ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली व त्यानंतर विद्यापीठाने परिपत्रक जारी केले. विद्यापीठाने विद्यापीठातील विभाग, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमधील विविध शुल्क व त्यावरील सूट याची यादीच जाहीर केली आहे. याहून कुठल्याही इतर पद्धतीचे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये, अशी सूचना कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी दिली आहे.
प्रात्यक्षिके नाहीत, तरीदेखील ५० टक्के शुल्क का
संबंधित परिपत्रकानुसार ज्या अभ्यासक्रमांत प्रात्यक्षिके असतात तेथे पदवीला ६०० रुपये (मानवविज्ञान), ९०० रुपये (विज्ञान व तंत्रज्ञान) तर पदव्युत्तरसाठी १००० रुपये प्रयोगशाळा शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा फ्रिशिप मिळत नाही त्यांना या शुल्कातून ५० टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे; परंतु ऑनलाइन अध्यापनात प्रयोगशाळांचा उपयोगच होत नाही. अशा स्थितीत त्यांनी ५० टक्के प्रयोगशाळा शुल्क का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
१०० टक्के सूट दिल्याने फायदा किती
विद्यापीठाने ९ शुल्कांमध्ये १०० टक्के सूट दिली आहे. मात्र ११ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या शुल्कासंदर्भातील निर्देशांनुसार या ९ शुल्कांपैकी एकही पाचशे रुपयांच्या वरील नाही. जर गणित मांडले तर यातून अनुदानित व पदव्युत्तर विभागांतील विद्यार्थ्यांना ६५० रुपये व विनाअनुदानित विभागांतील विद्यार्थ्यांना ८३० रुपयांची सूट मिळणार आहे.