करवसुलीअभावी ग्रामपंचायतींची अर्थकाेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:26 AM2020-12-04T04:26:41+5:302020-12-04T04:26:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्राेत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर वसूल न झाल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्राेत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर वसूल न झाल्याने ग्रामपंचायती अर्थकोंडीत सापडलेल्या आहेत. यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. मार्च महिन्यापासून आठ महिन्यांचा कालावधी संपला असून, कोरोना प्रभावामुळे ग्रामपंचायतींना कराची रक्कम वसूल करता आली नाही. परिणामी विकासाची घडी विस्कटली आहे. सध्या तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीअंतर्गत ९ काेटी ६१ लाख ३३ हजार रुपयांची वसुली करावयाची आहे. त्यापैकी सप्टेंबर २०२० पर्यंत फक्त ७४ लाख ४५ हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.
गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीला कराच्या रूपाने मिळणारे उत्पन्न आधार ठरते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कराची वसुली थांबली आहे. काही नागरिकांकडे अजूनही मागील वर्षाचे कर थकीत आहेत. ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे, त्या ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक पाहत आहेत.
अनेक ग्रामपंचायती केवळ गृहकरावर अवलंबून आहेत. गृहकरापोटी १ एप्रिल २०२० पर्यंत २ काेटी २९ लाख ९७ हजार थकबाकी असून, २०२०-२१ ची गृहकर मागणी ५ करोड २३ लाख ६६ हजाराची आहे. यात थकीतपैकी १७ लाख ८० हजार तर चालू करापैकी ३२ लाख २६ हजार अशी एकूण ५०.०६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच सामान्य व विशेष पाणी करापोटी १ एप्रिल २०२० पर्यंत ४९ लाख ८२ हजार थकबाकी असून, २०२०-२१ ची मागणी १ काेटी ५७ लाख ८८ हजाराची आहे. यात थकीतपैकी ५ लाख ९४ हजार तर चालू करापैकी १८ लाख ४५ हजार अशी एकूण २४ लाख ३९ हजार रुपयांची वसुली झाली. घरकर ७ टक्के तर पाणीकर १२ टक्के वसूल झाला आहे. पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ही करवसुली पुरेशी नाही. अशा कठीण परिस्थितीमुळे जिल्हा परिषद प्रशासन मदत करणार का, असा प्रश्न पदाधिकारी विचारत आहेत.
.....
गावात विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी घरकर व पाणीकर वसुली महत्त्वपूर्ण ठरते. यामुळे नागरिकांनी थकीत करबाकी भरून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे.
- महेश्वर डोंगरे, गटविकास अधिकारी,
पंचायत समिती, कळमेश्वर.